पान:भाषाशास्त्र.djvu/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
भाषाशास्त्र.कोठें प्रवास केला; अनेक शब्दांचे कसकसें स्थलान्तर झालें; नानाविध भाषाप्रचारांत कोणत्या तऱ्हेनें फेरबदल होत गेले; इराण, आर्मीनिया, इजिप्त, ग्रीस, रोम, जर्मनी, नार्वे, इंग्लंड, इत्यादि देशांत संस्कृत शब्दांचें कशा प्रकारे रूपान्तर बनलें; पातालांत, अगर अपर गोलार्धावर ज्या भाषा बोलतात, त्या भाषांतील शब्दांत, संस्कृत शब्दांचें, म्हणजे अर्थात् आर्यहिंदूंच्या कुटुंबांतील शब्दांचे, कांहीं साम्य आहे, किंवा त्यांच्यातील शब्दकोश त्याहून अगदी भिन्न आहे; ह्याच गोलार्धाच्या तोयराशींत जीं अगणित लहान मोठीं बेटे आहेत, त्यांतील क्रूर लोक कोणती भाषा बोलतात; तसेच, ह्या रानटी लोकांच्या भाषापद्धतींत, व आफ्रिका खंडांतील सिध्धी, हबशी, आणि कृष्णदेही वनचरांच्या शब्दरचनेंत, किती व कशा प्रकारची भिन्नता आहे; इत्यादि संबंधी शोध फारच मोहक, विशेष चित्ताकर्षक, आणि निःसंशय फलप्रद आहेत.

भाषेची व्याख्या

 आतां, भाषाशास्त्राचें विवेचन करण्यापूर्वी, भाषा म्हणजे काय हें सांगून, तिची प्रथमतः व्याख्या देतो. आपलें मनोगत व्यक्त व्हावे यासाठी, किंवा आपल्या मनांतील कल्पना बाहेर पडून त्यांचे स्पष्टीकरण व्हावें एतदर्थ, अथवा आपले विचार एकमेकांस प्रदर्शित करता यावेत म्हणून, जी सांकेतिक चिन्हें ठरविण्यांत आलीं, अगर जी वाक्संज्ञा अमलांत आणिली, तिलाच भाषा हें नामधेय प्राप्त झालें.

 तथापि, श्लेचर प्रभृतीचे याहून अगदी भिन्न मत आहे.


 १ Collection Philologique, Bikkers. 1869.