पान:भावी हिंदी स्वराज्य.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वें.] स्थानिक स्वराज्य आहे. ग्रामपंचायतीचा प्रारंभ कोठून करावयाचा असा प्रश्न केला तर ग्राम (गांवा ) पासून हे उत्तर चटकन कोणीहि देईल. पण हिंदुस्थानांत ग्राम (गांव ) म्हणजे वाटेल तितका मोठा अगर लहान असू शकेल. एका गांवांत पांचशे सुद्धा माणसें नसतील व अशा गांवाने राजकीय अगर सामाजिक सार्वजनिक कामें अंगावर घेणे अशक्य असते. गांव सोडले म्हणजे हल्लींचा दुसरा राजकीय विभाग 'तालुका' होय. एका तालुक्यांत साधारणपणे ऐंशी नव्वद गांवे असतात व इतक्या माणसांनी किंवा क्षेत्राने प्रारंभ करणे मोठेपणामुळे अव्यवहार्य होते. केंद्रीभूत राजसत्तेत एका माणसाच्या आटोक्यांत राहील तो भाग म्हणजे तालुका हे ठीक होते. पण स्वायत्त स्वराज्यांत लोकांना स्वतःच्या नजरेखाली सहज घालतां येईल इतकाच प्रदेश पाहिजे, यासाठी तालुका व गांव यांच्या दरम्यान व साधारण सभासदाच्या आटोक्यांत असा भूगोलिक भाग घेऊन तेथून सुरुवात केली पाहिजे, बलीने राज्याची जी व्याख्या केली आहे ती या ठिकाणी ठीक लागू पडते. तो म्हणतो " आपल्या पोटाची व्यवस्था करून राहिलेल्या वेळांत ज्याचा कारभार केवळ स्वतःच्या माहितीने करता येईल त्याला 'राज्य' म्हणावें, आपण जमीनीवर उभे राहिलो असतो आपली नजर पोंचते इतकाच तो भाग असावा व त्याला 'स्थानीय म्हणावें" असें भृगुसंहितेंत सांगितले आहे. तात्पर्य, स्थानिक सामर्थ्य व स्वतःची आवरशक्ति या दोहींना पुरेल इतकाच तो मुलूख पाहिजे. जपानने हा प्रश्न ७२,००० गांवांचे १२,००० संघ स्थापून सोडविला आहे. या संघांच्या योगाने प्रत्येक सांदीकोंदींतील खेड्यांत सुद्धां विशिष्ट शिक्षण, विशिष्ट उत्पन्न, विशिष्ट व्यवस्था व विशिष्ट एकी ही स्थापन झाली आहेत. अशी योजना केल्याशिवाय ही टापटीप त्याला करतांच आली नसती. जपानच्या एका संघांत तीन ते चार हजार लोकसंख्या असते. क्वचित एक हजार संख्येचा तसाच तीस हजार संख्येचाहि संघ आहे. पण असे संघ फार थोडे, ओसाड जंगले किंवा दाट वस्तीची शहरे यांतच असे संघ आहेत. एका संघांत पांचसहा गांवे असतात. सर विश्वेश्वरअय्या यांनी स्वतः पाहिलेल्या एका संघाची स्थिति त्यांच्या ग्रंथावरून खाली देतो.