________________
बहुतेक ही कल्पना निघाली होती. परंतु भाषा एक असली म्हणजे जाती एक असलीच पाहिजे असें नाहीं, असें भाषाशास्त्रांतील तज्ञांनी ठरविले आहे. आर्य लोक एकत्र होते तेव्हां हिम, हिवाळा, वसंत काळ या अर्थाचे जे शब्द होते ते पौर्वात्य व पाश्चात्त्य भाषांत एक आहेत; परंतु उन्हाळा व हेमंत यांना शब्द नाहीत. यावरून आर्यांचे मूळ वसतिस्थान युरोप खंडाचे उत्तर भागांत होते हे स्पष्ट होते. व्याघ्र व सिंह या पशूना अविभक्त आर्यांचे भाषांत शब्द नाहीत या गोष्टीवरून तीच गोष्ट सिद्ध होते. मूळचे आर्य लोकांजवळ गुरेढोरे पुष्कळ असल्यामुळे त्यांना चांगल्या चाऱ्याचे मैदानांची आवश्यकता होती व त्यांच्यासारख्या जोमदार, धिप्पाड, गौरवर्णाचे लोकांची उत्तम वाढ होण्यास चांगली हवा, मुबलक मोकळी मैदानेच अवश्य होती. या सर्व गोष्टींवरून त्यांचे मूळ ठिकाण रशिआ देशांतील उरल पर्वताचे दक्षिणेपासून जर्मनीचे उत्तरभागापर्यंतचा देश असावा असे अनुमान काढले आहे. त्याचप्रमाणे पूर्वीच्या लोकांच्या सांपडलेल्या डोक्यांच्या कवच्यांवरूनही या अनुमानास बळकटी येते. टेलरचे आर्याचे मूलस्थान ( Origin of the Aryans) नांवाचे पुस्तकांत या वादाचे साधकबाधक गोष्टींचे थोडक्यांत चांगले विवेचन केलेले आहे. ___ आर्य लोक तेथून युरोप व आशिया खंडांत पसरले. आशियाचे बाजूस जे आले ते आक्सस व जगझार्टिज नद्यांचे बाजनें खोकंड व बदकशान पर्वतांपर्यंत आले. तेथून त्यांच्यापैकी काही इराण प्रांतांत गेले. व कांहीं हिंदूकुश पर्वत ओलांडून पूर्व अफगाणिस्थान देशांत येऊन राहिले. तेथून ते पंजाबाकडे वळले. पंजाबांतील मोठमोठ्या नद्या त्यांचे दृष्टीस पडल्या. त्यांना ते सिंधू असें म्हणूं लागले. इराणी लोक या नदीला हंदू म्हणू लागले. त्यावरून हिंद हैं नांव झाले. इराणी लोकांनंतर जे ग्रीक लोक आले ते या नदीला