पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. -:: सातारा येथील सन १९१४ सालचे ' विविध व्याख्यानमालेत ' प्राचीन हिंदुस्थानासंबंधाने थोडीशी माहिती मी सांगितली ती काही विद्वान मित्र मंडळीस पटली व ती माहिती ज्यास्त विस्तृत रीतीने लिहिल्यास उपयोगी होईल असा त्यांचा अभिप्राय पडला. इंग्रजी भाषेत या विषयावर पुष्कळ ग्रंथ आहेत परंतु मराठीत फार थोडे आहेत. म्हणून इंग्रजी ग्रंथांच्या आधारे मराठी भाषेत तशा प्रकारची माहिती देण्याचा हा यत्न आहे. या पुस्तकांत स्वतः माझ्या शोधाचा लवलेशही नाही. भाषेचे वगैरे दोष एवढेच काय ते माझें स्वतःचे आहेत. हा लेख मुख्यत्वेकरून मि. विन्सेंट स्मिथ या प्रसिद्ध ग्रंथकाराच्या पुस्तकाच्या आधाराने लिहिला आहे. तथापि मि. याप्सन, मि. व्हिस डेविड्स, डा. सर रामकृष्ण भांडारकर, प्रो. मूकरजी, मि. आयंगार वगैरे ग्रंथकारांच्या ग्रंथांची प्रसंगानुसार मदत घेतली आहे. मूळ आधार पाहून स्वतंत्र इतिहास लिहिण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे, व इंग्रजी ग्रंथांचे भाषांतर केले असतां विस्तार फार होतो म्हणून त्यापैकी कोणताच यत्न केलेला नाही. मराठीत सांप्रत या विषयावर फारच थोडे ग्रंथ आहेत म्हणूनच हा लेख लिहिण्यांत येत आहे. यांतील कमीपणा दृष्टीस येऊन तरी कोणी चांगला ग्रंथ लिहिल्यास या लेखाचा इष्ट हेतु सिद्धीस गेला असे मी मानीन. हा लेख छापण्यापूर्वी माझ्याःकांही विद्वान् मित्रांनी तो वाचून पहाण्याची कृपा केली. त्यांचे माझ्यावर उपकार आहेतच. परंतु त्यांतल्या त्यांत विशेषेकरून रावबहादुर काशिनाथ नारायण साने यांनी आपला अमूल्य वेळ खर्चुन विशेष काळजीपूर्वक वाचून बरेच दोष काढून टाकले याबद्दल त्यांचे उपकार मानावेत तेवढे थोडेच आहेत. मूळ इंग्रजी व मराठी ग्रंथकत्यांचे तर अर्थात् फारच उपकार आहेत हे सांगावयास नको. योग्य ठिकाणी त्यांचा नामानिर्देश केला आहे.