पान:भारतीय लोकसत्ता.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भारतीय लोकसत्ता

 वेदकाळांत सर्वत्र याच स्वरूपाची राजसत्ता चालू होती आणि इ. स. पूर्व ७ व्या शतकाच्या सुमारास याच शासनांत भारतांतील कांहीं प्रांतांत परिवर्तन झाले आणि त्यांतून अनेक ठिकाणी, विशेषतः वायव्य व ईशान्य हिंदुस्थानांतील अनेक प्रदेशांत, प्रजातंत्र अथवा गणराज्ये निर्माण झाली. जलालाबादच्या न्यासा नगरामध्ये, सियालकोटच्या कठराज्यांत, बियास नदीच्या पूर्वेकडील प्रदेशांत आणि सिंधूच्या कांठच्या मालव, क्षुद्रक इ. जमातींमध्ये प्रजातंत्र-राज्ये अस्तित्वांत होत असे ग्रीक इतिहासकारांनी नमूद केले आहे. पंजाबांत कंबोज, वृक, दामणि, दंडकि, त्रिगर्त इ. गणराज्ये नांदत होती. उत्तर प्रदेश व बिहार प्रांतांत भग्ग, कोलिय, शाक्य, लिच्छवि, विदेह इ. प्रजासत्ताक राज्ये असल्याचा पुरावा अलीकडे उपलब्ध झाला आहे. सौराष्ट्रांतील अंधकवृष्णींच्या संघाचे शासन प्रजासत्ताक पद्धतीचे असून भगवान् श्रीकृष्ण हा त्याचा अध्यक्ष होता. आपल्या कल्पनेप्रमाणे श्रीकृष्ण हा सम्राट नसून तो लोकनियुक्त अध्यक्ष होता आणि लोकांच्या टीका त्याला ऐकून घ्याव्या लागत, असे त्याच्याच उद्गारावरून पंडितांनी दाखवून दिले आहे. महाभारतांतील सभापर्वत किरात, दरद, औदुंबर, पारद, बाल्हिक, शिबि, यौधेय, त्रिगर्त, केकय, अंबष्ट, पौण्ड्र्, अंग, वंग, इ. अनेक संघराज्यांचा निर्देश केलेला सांपडतो. याशिवाय आर्जुनायन, माद्रक, आभीर, प्रार्जुन, सनकानीक, काक, अरिष्ठ, सौभूति अशा अनेक गणराज्यांचा उल्लेख इतर अनेक ग्रंथांतून सांपडतो. पाणिनीची अष्टाध्यायी चाणक्याचे अर्थशास्त्र, बौद्धांचा अवदानाशतक हा ग्रंथ, मेग्यास्थिनीसचे व इतर ग्रीक ग्रंथकारांचे लिखाण, हें या बाबतीतले मुख्य आधारभूत वाङ्मय होय. याच्या आधाराने इ. स. पूर्व ६०० ते इ. स. ४०० या काळांत उत्तर हिंदुस्थानांत शेकडों गणराज्ये नांदत असल्याचे पंडितांनी आता निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

प्रातिनिधिक पद्धतीचा अभाव

 भारतांतील या गणराज्यांत प्रतिनिधि निवडण्याची पद्धति उदयास आलेली नव्हती. या सर्व लोकसत्ता साक्षात् किंवा प्रत्यक्षस्वरूपाच्या होत्या. हजार, दहा हजार किंवा एक लाख लोकांना एक प्रतिनिधि असावा आणि