पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६
भारतीय लोकसत्ता

वर्षांच्या रूढी, त्याच्या मनावरचे सर्व प्रकारचे जुनाट संस्कार हे सर्व या आगीत जळून खाक व्हावयाचें, हा गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासावरून स्पष्ट दिसून येणारा सिद्धांत आहे. १९२४ सालीं मार्क्सप्रणीत तत्त्वांचे हे सामर्थ्य इतक्या उत्कटत्वानें जगाच्या निदर्शनास आले नव्हते, पण युरोपांतील सत्ताधारी वर्गाला त्याची जाणीव झाली होती यांत शंका नाहीं, आणि या सर्व सत्ताधाऱ्यांत अत्यंत श्रेष्ठ, सावध व दक्ष असे जे ब्रिटिश लोक त्यांना तर मार्क्सवाद हा अंतर्बाह्य चांगलाच परिचित झाला होता. कारण १८५० सालापासून मार्क्स व एंगल्स यांचे सर्व कार्य त्यांच्याच भूमींतून चालले होते. हिंदुस्थानांतील या नव्या चळवळीचा, या नव्या आगीचा अर्थ त्यांनी तत्काळ जाणला आणि जन्मतःच तिचा नायनाट करण्याच्या हेतूनें आपल्या सर्व सामर्थ्यानिशी १९२४ सालापासूनच प्रयत्न सुरू केले. त्याच साली कानपूर-कटाचा खटला सुरू झाला आणि डांगे, शौकत उस्मानी प्रभृति कम्युनिस्ट नेत्यांना सरकारने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
 अशा रीतीनें हिंदुस्थानांत कम्युनिस्ट चळवळीचा प्रारंभ झाला. त्याच्या आधीं वर सांगितल्याप्रमाणे मजुरांच्या फारशा संघटनाच नव्हत्या आणि १९१७-१८ च्या सुमारास ज्या संघटना अस्तित्वांत आल्या होत्या, त्यांचें स्वरूप अगदीं साधे म्हणजे कम्युनिस्टांच्या भाषेत सुधारणावादी होते. १९२० सालीं हिंदुस्थानांतील सुमारें २०० ट्रेड युनियन्सचे प्रतिनिधि मुंबईस एकत्र जमले व त्यांनी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. यावेळी लजपतराय या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व बॅ. जोसेफ बॅप्टिस्टा हे उपाध्यक्ष होते. येथून पुढे या कामगार संघटनेचीं दरसाल अधिवेशन भरूं लागलीं. पण वर्गविग्रह, भांडवलदारशी लढा, कामगारांचे अधिराज्य साम्राज्यशाहीचा पाडाव या जहाल तत्त्वांचा अवलंब अजून कामगारांनी केला नव्हता. कामगारांची स्थिति सुधारणें, कामाचे तास कमी करणे, वेतनवाढ करणे, घरांची सोय करणे, फॅक्टरी ॲक्टसारखे कायदे करण्याची सरकारला विनंति करणे एवढीच या संघटनेच्या कार्याची व्याप्ति होती; आणि असे होते तोपर्यंत सरकारचाहि तिला पाठिंबा होता. नारायण मल्हार जोशी हे त्या क्षेत्रांत त्यावेळी प्रमुख कार्यकर्ते होते. अखिल भारतांतील