पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१३
भारतीय लोकसत्ता व समाजवाद

ही फार चांगली गोष्ट झाली. काँग्रेसनें समाजवाद जरी पूर्णपणे मान्य केला नाहीं, तरी तिच्या विचाराला ते वळण तत्त्वतः तरी लागलेंच. आणि मुख्य म्हणजे काँग्रेसच्या थोर व्यासपीठावरून पंडितजींनीं प्रचार केल्यामुळे समाजवाद भारतांत प्रसृत होण्यास फार साह्य झाले. जयप्रकाश नारायण यांचे चरित्रकार एच्. एल्. शेठ यांनी पंडितजींच्या या ऋणाचा प्रांजलपणें निर्देश केला आहे. ते म्हणतात, 'नेहरूंनी जयप्रकाशांचा मार्ग सुकर करून दिला. त्या काळी नेहरू जे सांगत तें जयप्रकाशांनी सांगितले असते तर त्यांचे कोणींच ऐकलें नसते. या दृष्टीने समाजवाद हा नेहरूंचा फार ऋणी आहे. ब्रिटिश मजूरपक्ष हा जसा सिडने वेब, जॉन स्ट्रेंची यांचा ऋणी आहे, तसाच येथला समाजवादी पक्ष नेहरूंचा ऋणी आहे. नेहरू जरी समाजवादी पक्षाला कधीं मिळाले नाहीत, तरी समाजवादी पक्षाला त्यांच्या व्यक्तिमत्वापासून अलग करणे कधींच शक्य नाहीं. त्यांचे संबंध अविभाज्य आहेत.' (रेड फ्युगिटिव्ह पृ. २९). पंडितजींच्या या क्षेत्रांतील कार्याचे महत्त्व यावरून कळून येईल.
 वर सांगितल्याप्रमाणे मॉस्कोहून परत आल्यावर सोव्हिएट रशियाचा नवा संदेश ते एकनिष्ठेनें प्रसृत करूं लागले. १९२८ सप्टेंबरमध्ये ते बंगाल- विद्यार्थी-परिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळीं अध्यक्षपदावरून त्यांनी समाजवादाचाच संदेश दिला. 'समाजवादी शासन हेच आपले ध्येय आहे. कांहीं लोकांना समाजवादाची भीति वाटते; पण ते अज्ञ आहेत. त्यांनीं जग पाहिलेले नाहीं. यापुढे जगाला समाजवादावांचून दुसरा तरणोपाय नाहीं.' असे त्यांचे उद्गार आहेत. त्याच सालीं ऑक्टोबरमध्ये झांशीला प्रांतिक परिषद झाली. तेथे त्यांनी हाच विचार सांगितला. 'आपल्या प्रांतांतील जमीनदारी नष्ट करणे हा आपला कार्यक्रम असला पाहिजे, या जमीनदारांना भरपाई देणें सर्वस्वी अशक्य आहे. तेव्हां अगदी अल्प मोबदला देऊन त्यांच्या जमिनी जप्त करणे हेच समर्थनीय आहे' असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. १९२९ साली लाहारेच्या काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. तेव्हां त्या श्रेष्ठपदावरून त्यांनी आपण समाजवादी असल्याचे जाहीर पणे सांगून महात्माजींच्या, जमीनदार-भांडवलदार हे निधिधारक आहेत, या कल्पनेवर कडक टीका केली. यांना निधिधारक म्हणावयाचें तर ब्रिटि-