पान:भारतीय लोकसत्ता.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१२
भारतीय लोकसत्ता

जमीनदारीच्या प्रांतांतले किसानहि पुष्कळसे लढ्यांत सामील झाले होते. अर्थात् यांत समाजवादी पक्षाची पुण्याई बरीच मोठी आहे; पण कामगारशक्ति मात्र काँग्रेसला कधींहि वश झाली नाही आणि पुढे पुढे किसानांचीहि निराशा झाली; त्यामुळेच काँग्रेस आज हतबल होऊन बसली आहे.
 पण आधी ब्रिटिशांविरुद्ध लढा व मग येथील धनिकांविरुद्ध, हे धोरण मतभेद म्हणून मान्य होण्याजोगे होते. त्याचप्रमाणे, मार्क्सवादी पद्धतीने रशियांतल्याप्रमाणे हिंसामय मार्गानें जमीनदारी- भांडवलदारीचा नाश करूं नये, सत्याग्रह व असहकार या मार्गांनी त्यांच्याशी लढा करावा, या तत्त्वाचाहि सर्वांनी आनंदानें पुरस्कार केला असता; पण जमीनदारी- भांडवलदारी आणि धनिकवर्ग हा समाजाच्या स्वास्थ्याला अवश्य आहे, धनिक हेहि राष्ट्रनिष्ठ असतात म्हणून त्यांना निधिधारक व्हावयास सांगणे हाच आर्थिक समतेचा उपाय होय, जुनी वर्णाश्रमव्यवस्था पुन्हां प्रस्थापिली पाहिजे, कामगार संघटनेचा राजकीय उपयोग करता कामा नये, हीं जीं काँग्रेसनेत्यांची मतें तीं आपल्या राष्ट्राला फार घातक ठरलीं आहेत व ठरणार आहेत. तरुण पिढी काँग्रेसला सोडून जात आहे, गेली आहे याचे हेच कारण आहे. आणि ही हानि सर्वांत मोठी आहे.

समाजवादाचे प्रणेते- पंडितजी

 पण या बाबतीतल्या काँग्रेसच्या विचारसरणीचा परामर्ष मी स्वतंत्रपणे घ्यावा अशी जरूर नाहीं. पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या थोर पुरुषानें हें कार्य केले आहे. आपणांस त्यांच्या विचारांचा परिचय करून घ्यावयाचाच आहे. तेव्हां तीं दोन्हीं कार्ये एकदमच साधण्यासाठी पंडितजींच्या समाजवादी तत्त्वज्ञानाची आतां माहिती करून घेऊ.
 मागें सांगितल्याप्रमाणे पंडितजींनी रशियांतून जाऊन आल्यावर १९२८ सालापासून समाजवादी तत्त्वज्ञानाचा भारतांत प्रसार करण्याचे कार्य मोठ्या हिरिरीने सुरू केले आणि तें अखंड वीस वर्षे मोठ्या निष्ठेनें चालविलें. पंडितजी स्वतः समाजवादी पक्षाला कधींच मिळाले नाहींत. काँग्रेसनेत्यांशीं त्यांचे तीव्र मतभेद झाले, तरी त्यांनीं कधीं काँग्रेस सोडली नाहीं. माझ्या मतें