पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९६
भारतीय लोकसत्ता

तेथें अत्यंत अनियंत्रित सुलतानी सत्ता प्रस्थापित झाली. याचे कारण हेंच कीं, तेथील जनता कधींच जागृत नव्हती; तेव्हां तेथें समाजवादाचा प्रयोग झालाच नाहीं असें म्हटले पाहिजे.
 जागृत लोकमत हा लोकशाहीचा मूलाधार होय. ते गृहीत धरले तर महायंत्रोत्पादनामुळे होणाऱ्या केंद्रीकरणाला भिण्याचे कारण नाहीं. आणि ते गृहीत धरले नाहीं, तर ग्रामवादांतहि लोकशाही जगणे शक्य नाहीं. उद्योगधंदे अगदी अल्परूप असले तरी, जनता प्रभावी नसेल तर, कोणताहि गावगुंड ते आपल्या ताब्यांत घेऊन समाजाचे शोषण करूं शकेल. मागल्या काळांत उद्योगधंदे अगदी कमालीचे अल्परूप होते. पण कोणीहि येऊन प्रजेला लुबाडावें, वसुली करावी, नागवावे अशी स्थिति होती. देशमुख, देशपांडे, जहागीरदार, जमीनदार यांची सत्ता खेड्यावर अगदी अप्रतिहत चालत असे. हे लोक म्हणजे मूर्तिमंत अनियंत्रितता होती. त्या काळी लोकशाही होती, ग्रामाच्या लहान परिसरांत प्रजासत्ता होती हा केवळ भ्रम होय. प्रारंभीच्या प्रकरणांत याचें सविस्तर विवेचन केलेच आहे. तेव्हां यावरून हें ध्यानीं येईल कीं, उद्योगधंद्यांच्या केंद्रीकरणावर वा विकेंद्रीकरणावर कांहीं अवलंबून नाहीं. जनता जागृत असून तिचें मत प्रभावी असेल तर वाटेल तितकें केंद्रीकरण झाले तरी ती सत्तेचें केंद्रीकरण होऊ देणार नाहीं आणि ती दुबळी, अज्ञ व असंघटित असेल तर सर्वस्वी हातव्यवसायनिष्ठ उद्योगधंदे असले तरी सत्ता केंद्रित झाल्यावांचून रहाणार नाहीं. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या हाती सत्ता, धन, सामर्थ्य या सर्वांचें केंद्रीकरण झाले होते; पण महात्माजींनीं जनता जागृत करून ती सत्ता त्यांच्या हातून हिरावून घेतली. जमीनदार, भांडवलदार यांच्या हाती त्यांचे सर्व धन व उत्पादनसाधनें तशींच ठेवूनहि त्यांचे नियंत्रण आपण जागृत लोकमताच्या प्रभावाने करूं शकूं, असा त्या पक्षाचा विश्वास आहे. असे असतांना त्यांनी समाजवादांतील केंद्रीकरणावर आक्षेप घ्यावा, हे एक अनाकलनीय असे गूढ आहे.
 महायंत्रोत्पादनानें बेकारी येते, हा आक्षेपहि असाच भ्रामक आहे. एक यंत्र शंभर माणसांचे काम करतें. तेव्हां ते वापरल्यास शंभर माणसें बेकार होतात, असा बालसुलभ हिशेब देऊन ग्रामवाद यंत्रावर आक्षेप घेऊ पहातो.