पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
प्राचीन भारतांतील लोकसत्ता

हळूहळू हे बळ प्राचीन प्रजातंत्रांतून नाहीसे होऊं लागले व मग त्यांचा विनाश ओढवला.
 'राजा हा विष्णूचा अवतार आहे' हे तत्त्व हळूहळू प्रभावी होऊन प्रजातंत्राच्या विनाशास तेहि कारणीभूत झालें. अर्थात् स्वतंत्रपणे कोणचेहि एक कारण येवढ्या मोठ्या परंपरेच्या नाशास समर्थ होत नाहीं. हीं सर्वच कारणे हळूहळू विनाश घडवून आणतात. तीं कांहींशीं परस्परावलंबीहि असतात आणि कालांतराने त्यांचा परिपाक होतो. 'राजा विष्णूचा अवतार आहे' हे तत्त्व लोकप्रिय होण्यास संघराज्यांतील यादवी, कलह तज्जन्य दौर्बल्य हींच कारणीभूत होतात. अराजकाला लोक कंटाळतात. त्यांना शांतता हवी असते. ती एखाद्या राजाने प्रस्थापित केली म्हणजे त्यांना तो परमेश्वराचा अवतार वाटू लागतो. प्राचीन काळांत भारतांतहि हाच प्रकार घडला आणि दीर्घ काल चाललेल्या एका थोर परंपरेचा सर्वस्वी लोप झाला. इसवी सनाच्या पांचव्या शतकांत प्रजासत्ताक राज्यें भारताच्या भूमीवरून अजिबात नाहींशी झाली.
 प्राचीन काळी भारतामध्ये ज्या लोकसत्ता होत्या, त्यांचे स्वरूपवर्णन येथवर केले. डॉ. जयस्वाल, डॉ आळतेकर व प्रा. द. के. केळकर यांच्या लेखनाच्या आधारेच हे वर्णन केलेले आहे. त्यावरून त्या वेळच्या गणराज्यांची स्थूलमानाने कल्पना येईल. हे वर्णन झाल्यावर आतां आपल्याला जरा चिकित्सेत शिरावयाचे आहे. लोकसत्ता ही बाह्यरूपाच्या दृष्टीने भारतांत प्राचीन काळी अवतरली होती, यांत वरील वर्णन वाचल्यावर मुळींच संदेह रहात नाहीं; पण एवढ्यावरून लोकशाहीचा उदय भारतांत प्रथम झाला असे आपणांस म्हणतां येईल काय असा प्रश्न आहे. पाश्चात्य पंडितांचा व आतांपर्यंत पौर्वात्य पंडितांचाहि असा सिद्धान्त होता कीं, लोकशाहीचा उदय प्रथम ग्रीसमधील अथेन्स या नगरीत झाला व त्याची कांहींशीं परिणति रोममध्ये झाली आणि अर्वाचीन काळांत तिचा खरा विकास ब्रिटनमध्ये झाला. हा सिद्धान्त मांडतांना पाश्चात्यांनीं कांहीं अतिरेकी विधाने केली आहेत. तीं आतां क्षणभरहि टिकावयाचीं नाहींत हें खरें; पण एवढ्यावरून त्यांच्या मूळ सिद्धान्ताला बाध येईल असे कांहीं या संशोधनांतून सिद्ध झालें आहे काय, या प्रश्नाचा विचार करावयाचा आहे.