पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[प्रकरण
भारतीय रसायनशास्त्र



मार्गांतीलच होते. यांपैकी बहुतेक ‘मंत्रसिद्ध' ही असत; त्यांस मंत्रसिद्ध किंवा सिद्धवैद्य ह्मणत; हे आपल्या मंत्रशक्तीने मनुष्यजातीचे रोग बरे करीत. रससिद्ध व मंत्रसिद्ध हे बहुधा लोकांत फारसे मिसळत नसत; हे योग, मंत्र, तंत्रादि आपापल्या अनुष्ठानांत नेहमीं गढलेले असत. हे बहुतेक शैवपरंपरेचे तांत्रिक असत; यांच्याविषयीं बहुजनसमाजांत फार पूज्यबुद्धि असे. कारण, हे बहुधा विरक्त व निःस्पृही असत. रससिद्ध व मंत्रसिद्ध हे लोकांत फारसे मिसळत नसल्यामुळें, त्यांनीं अरण्यांमधून राहून वनस्पति, पारा, धातु, रसें, उपरसें, रत्नें, उपरत्नें यांविषयीं लावून ठेविलेले शोध ज्या अस्सल ग्रंथांत आहेत, ते सहसा मिळत नाहीत; त्या परंपरेतील लोकांसच ते मिळतात. असो. तेव्हां रसशास्त्रें ही प्रथम वैद्यकांतूनच निघालीं; वैद्यकाकरितांच त्यांची परिणति झाली; व देहसिद्धिलोहसिद्धि यांत त्यांची परिसमाप्ति झाली. लोहसिद्धि व देहसिद्धि यांस प्राचीन ग्रंथांतून ‘रस' व 'रसायन' ह्मटलेले आहे. आतां मात्र आह्मीं 'रसायन' शब्द लोहसिद्ध ऊर्फ किमयेला लावतों; अलीकडच्या संस्कृत रसवैद्यकावरील ग्रंथांत देखील हाच घोटाळा आहे. फार प्राचीनकाळीं रसविद्या व रसायनविद्या मिळूनच प्रवृत्त झाल्या व त्या मिळूनच ग्रंथांतून आढळतात; व प्राचीन ग्रंथांत तर रसायनकर्मास ह्मणजे आयुर्वृद्धीस भस्मादिक पदार्थ उपयोगी पडण्यापूर्वीं त्यांची आधीं लोहावर परीक्षा पहावी असे सांगितले आहे. ( आदौ लोहे परीक्षेत पश्चाद्देहे तथैव च ||) यामुळे एकेकाळीं रसविद्या ( किमया ) व रसायनविद्या ( देहसिद्धि ) जोडीनेच परिणत-दशेस आलेल्या होत्या; व अस्सल रसग्रंथांत प्रथम रससिद्धि सांगून नंतरच रसायनसिद्धि सांगितलेली आहे. या प्रकारें रसशास्त्रांचा उगम वैद्यकांत, परिणति -वैद्यकांत व परिसमाप्ति लोहसिद्धींत व देहसिद्धीत, अशा जरी एकेकाळी स्थिति होती, तरी रसविद्या ही नेहमी फार गुप्त असे. त्यामुळे रसशास्त्रांतील देहसिद्धीचा तेवढा भाग प्रचारात येऊन रससिद्धि ऊर्फ लोहसिद्धि मागें पडली; व केवळ रसवैद्यकावरचेच तेवढे ग्रंथ भराभर पुढे निपजूं लागले. यामुळे रसवैद्यक ( देहसिद्धि ) व रसशास्त्र (किमया ) असा भेद होऊन दोन्हीं शास्त्रांवर स्वतंत्र ग्रंथ निर्माण होऊन एकमेकांचा