पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[प्रकरण
भारतीय रसायनशास्त्र

जावयाचें? तेव्हां त्या त्या विषयांचे मर्म कळण्यास्तव त्याविषयींचे स्वतंत्र वाङ्मयच मिळावे लागते हे उघड आहे.
 २ पण अशी स्थिति रसायनशास्त्राविषयीं नाहीं हें पाहून त्याविषयी शोध करण्याचे ठरविले. या शास्त्रावरचे स्वतंत्र ग्रंथ संस्कृतमध्यें उपलब्ध आहेत. रसायनशास्त्राविषयीं संस्कृतमध्यें बरेंच वाङ्मय आहे. ह्याविषयी प्रथम माहिती डा. गर्दे यांच्या वाग्भटाच्या प्रस्तावनेवरून मिळाली; त्यानंतर त्यांत आलेल्या रसरत्नसमुच्चयाचे अध्ययन करून पाहिलें. त्या सूक्ष्म अध्ययनामुळें प्राचीन ग्रंथ या शास्त्रावर शेकडो आहेत हे कळून आले! एकेका ग्रंथावरून दुसऱ्या ग्रंथांचा पत्ता लागत चालला ! अद्यापि कांहीं सर्वच ग्रंथ उपलब्ध झालेले नाहीत ! ग्रंथ पहातां पहातां कलकत्त्याचे रसायनशास्त्राचे प्रो. प्रफुल्लचंद्रराय यांचा History of Hindu Chemistry हा ग्रंथ पहाण्यास मिळाला; पण या ग्रंथाच्या पहिल्या भागांत रसायनशास्त्रीय ग्रंथांविषयी फार थोडी माहिती आहे; तथापि ती त्यावेळी अधिकच होती ! हा पहिला भाग लिहिल्यानंतर ग्रंथकर्त्यास व आह्मांलाही बरेच नवे ग्रंथ व नवी माहिती मिळालेली आहे. ती त्यांच्या दुसऱ्या भागांत येणार आहे ह्मणे! पण येईल तेव्हां खरी!* प्रो. रॉय यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांस कोणते ग्रंथ मिळालेले आहेत याचा शोध केला. अलीकडे श्रीवेंकटेश्वरप्रेसमध्ये छापलेल्या नित्यनाथाच्या रसरत्नाकराची प्रत पाहिली; पण त्यांत पांच खंडांपैकी फक्त दोन खंडच छापलेले आहेत. तीन खंड नाहींत. भूमिकेंत हिंदी टीकाकाराने रसशास्त्रीय ग्रंथांची यादी दिलेली आहे, ती शोध करणारांस अत्यंत उपयुक्त व चांगली आहे. त्यानंतर रुद्रयामलांतील कांहीं कलांचा भाग, रसकौतुक व रसरत्नाकरांतील अप्रसिद्ध असे बादिखंड हे महत्वाचे ग्रंथांचे त्रुटित भाग मिळाले. रसराजसमुच्चयांतील काकचंडीश्वर-मतही मिळाले. आयुर्वेदप्रकाश, कौतुकचिंतामणि, नागार्जुनीयकक्षपुट व रसरत्नाकर, योगतरंगिणी वगैरेही पाहिली. या सर्व अवलोकनामळे असे वाटू लागलें कीं, ही सर्व माहिती संगतवार लिहून ठेवल्याखेरीज पुढील शोधकांस आपल्या


 * दुसरा भागही आतां प्रसिद्ध झालेला आहे; व त्यांत बरीच अधिक माहिती आहे.