पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.
विषयप्रवेश

 या स्वदेशी चळवळीच्या काळांत नाना शोधकांनीं नाना प्रकारच्या ग्रंथोदधींचे अवगाहन केले. देशभक्त माधव मैराळ सुरतकर यांनी वास्तुशास्त्र व शिल्पशास्त्र यांविषयीं व्यासंग करून त्यांविषयी आपले शोध केसरी व काळ पत्रांतून प्रसिद्ध केले, व अलीकडे त्यांनी ते स्वतंत्र पुस्तकरूपानेही प्रसिद्ध केलेले आहेत. उद्योगधंदे व शास्त्र (Science ) याविषयींचे वाङ्मय शोधून आजच्या हीनस्थितींत त्याचा कसा उपयोग करून घेतां येईल याचा विचार करणें अत्यंत जरूर आहे. मींही मागें केसरीमधून शिल्पशास्त्राविषयी मिळेल तितकी माहिती मिळवून प्रसिद्ध केली. त्यानंतर लागलेले शोध व पूर्वीची अस्सल माहिती यांचा सुसंगत इतिहास देऊन एक निबंध तयार केलेला आहे; व तो समालोचकांतून* प्रसिद्ध केलेला आहे. दे. शिवकर बापूजी तळपदे ( मुंबई ) यांनी प्राचीन विमानविद्येविषयीं शोध चालविले आहेत; पण मजा अशी की, अद्यापि प्राचीन शिल्पशास्त्र व यंत्रशास्त्र यांविषयी सविस्तर माहितीचे असे स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध होत नाहींत. यामुळें त्या शास्त्रांविषयींचे शोधांत प्रगति, सध्या तरी, होणे शक्य नाहीं. नुसत्या प्राचीन ग्रंथांतील तुरळक तुरळक उल्लेखांवरून फार झाले तर त्या त्या विद्या आपल्यांत होत्या एवढे कळून येईल; पण त्यांयोगे त्या विद्यांचे रहस्य कळणार नाहीं ! एवढ्याही उल्लेखांचा अगदीच उपयोग नाहीं असें नाहीं; कारण, हे उल्लेख ह्मणजे तद्विषयक ग्रंथोदधीकडे बोट दाखविणाऱ्या वाटाड्यांसारखे आहेत. कोणत्याही विद्येविषयींचे स्वतंत्र ग्रंथ मिळेपर्यंत त्या विद्येविषयीं खरी कल्पना उपजणें शक्य नाहीं. विमानांविषयी व इतर यंत्रांविषयीं सध्यां अशीच स्थिति झाली आहे. वेद, रामायण, भारत, पंचतंत्र, सिद्धांतशिरोमणि, बृहत्कथा, इत्यादि इतर विषयप्रतिपादक ग्रंथांत ओघानें कोठें कोठें कांहीं कांहीं यंत्रांचीं वर्णने आलेली आहेत; पण एवढ्यावरून त्या त्या यंत्रांचे स्वरूप कसे सम-


 * समालोचक, ( वर्ष दुसरें ), अंक २१ वा, पहा.