पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/516

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२४) त्यांच्या मनांत वेधबुद्धि उत्पन्न करण्याचा, तसेंच आमच्या प्राचीन ग्रंथांचा इतिहास त्यांस माहित करून देण्याचा व उपपत्तिभागाचे जुन्या किंवा नव्या पद्धतीने अध्ययन करण्याविषयी त्यांचा कल होऊन ते होण्याचा काही उपाय निघून तसे प्रयत्न होतील तर केवढें काम होईल! आणि व्यक्तिशः प्रयत्नांपेक्षां मंद गतीने का होईना परंतु राष्ट्राची बुद्धि जागृत करण्याचे वर लिहिल्यासारखे प्रयत्न होतील तर त्यांची फलें चिरस्थायी होतील. राष्ट्रांतील मोठमोठ्या ठिकाणी आमची प्राचीन यंत्रे आणि प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह होऊन जुन्या पद्धतीने तसेंच नवीन पद्धतीने वेध घेण्यासाठी वेधशाला आणि अध्ययनशाला होतील तर आमच्या प्राचीन पूर्वजांनी चांगल्या स्थितीस आणलेलें ज्योतिःशास्त्र उज्ज्वल स्थितीत राहील आणि जास्त उज्ज्वल होईल. पंचांगशोधनासंबंधी वर जी शंकराचार्यादिकांची तीन कर्तव्ये सांगितली त्यांनीं रोग झाला आहे तो बरा करण्याच्या मार्गास लागणे, एवढेच केल्यासारखे होईल. परंतु ह्या तात्कालिक फलप्राप्युपायापेक्षां चिरस्थायी काही तरी केले पाहिजे. आमचा ज्योतिःशास्त्रवृक्ष प्राचीनकाळी आमच्या देशांत उत्तम भूमीत उगवून मोठ्या जोराने वाढत होता. त्यास वारंवार उदक मिळत होते. त्याच्या फलांचा आस्वाद घेऊन सर्व लोक तृप्त होत होते. त्याच्या पुष्पांचा सुवास ह्याच देशांत सर्वत्र पसरला होता असे नाही, तर दूरदूरच्या देशांतही पसरला होता. व कदाचित् फार प्राचीनकाळी परदेशीय गणक मेघांकडून ह्याच्या आलवालांत थोडेबहुत जलबिंदु पडले असले तरी पुढे ह्याच्यापासून उत्पन्न झालेलें बीज त्या देशांत जाऊन तेथे नव्या ज्योतिर्वृक्षाची उत्पत्ति झाली, किंवा पूर्वीच्याचे पुनरुज्जीवन झाले असें ह्मणण्यास हरकत नाही, असे इतिहासावरून निःसंशय दिसत आहे. असा हा वृक्ष असतां पुढे ह्याची वाढ खुंटली; ह्यास पाणी मिळेनासे झालें। अर्थात त्यावरील कोमल पल्लव कोमेजले. प्राचीनकाली मिळालेल्या पाण्याने व पुढे कधी काळी मिळणाऱ्या थोड्याशा बिंदूंनी तो जीव धरून आहे, व अद्याप कशी तरी आंबटकडू फळे देत आहे. परदेशी पहावें तर ह्याच वृक्षाच्या बीजापासून उत्पन्न झालेला किंवा ह्याच्यायोगाने पुनरुज्जीवन पावलेला वृक्ष इतका जोमाने वाढला आहे व वाढत आहे की, त्याखाली हजारों जीवांना आश्रय मिळत आहे. त्याचा विस्तार पाहिला तर त्याचा आमच्या देशांतल्या वृक्षाशी काही संबंध असेल असे कोणाच्या मनांतही येणार नाही. इतकें महदंतर दोन वृक्षांमध्ये पडण्याचे मुख्य कारण पाहिले तर तिकडील वेधशाळांत त्यास मिळणारे उदक होय; तर ह्या वेधशाळांची स्थापना इकडे होऊन इकडेही त्याचे पुनरुज्जीवन होऊन तो वृद्धिगामी होऊन केव्हां तरी पूर्णावस्थेस येईल असें करण्याविषयीं तो जगच्चालक सविता सर्वास प्रेरणा करो. आणि वर लिहिल्याप्रमाणे राष्ट्रांतःकरणभूमिका बीजावापास संस्कृत झाली आहे, अशा काली पूर्वी वेळोवेळी ज्योतिषास बीजसंस्कार उत्पन्न झाले व सांप्रतही कांहीं अंशी झाले आहेत तसे होण्याची साधनें उत्पन्न होऊन वाढोत आणि तसे बीजसंस्कार स्वतंत्र ग्रंथरूपाने देणारे स्वयंभूसवितृप्रेरित पुरुष उत्पन्न होवोत.