पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१६) त्या या ग्रंथात मी साधल्या असें झणण्याचा वराहाचा उद्देश आहे. यावरून पूर्वग्रंथांहून काही तरी अधिक त्याने पंचसिद्धांतिकेंत केले असावे असे दिसते. त्यापैकी मध्यमग्रहांचा संस्कार वर सांगितलाच. बाकी गोष्टी काय जास्त केल्या हे समजण्यास मार्ग नाही. तथापि मूळांत मोठा फेरफार त्याने केला असेल असें संभवत नाहीं. पांच सिद्धांतांपैकी ज्या गोष्टी अनुभवास मिळतात असे त्यास वाटले व ज्या सामान्य रीति उपपत्तीस अनुसरून शुद्ध आहेत अशा त्यास दिसून आल्या त्या देऊन बाकी गाळल्या एवढे केले असेल असे दिसते. शिवाय देशांतर, छायासाधन, ग्रहण छेयक यांसंबंधे काही रीति त्याच्या स्वतःच्या असतील असें संभवते. याने प्रथम करणग्रंथ केला. परंतु पुढे याचें लक्ष्य फलज्योतिषाकडे आणि विशेषतः नानाप्रकारचे सृष्टचमत्कार, पदार्थांचे गुणधर्म आणि त्यांचा व्यवहारांत उपयोग यांकडे फार लागले असावें असें त्याच्या संहिताग्रंथावरून दिसते. ब्रह्मगुप्ताने पूर्वज्योतिष्यांस दोष दिले आहेत, परंतु त्यांत वराहमिहिरास कोठे दोष दिला * नाही. भास्कराचार्याने त्याची स्तुति केली आहे. आणि दुसऱ्या अनेक ग्रंथांत वराहमिहिराची वचने आधारास घेतली आहेत. साष्टिशास्त्राच्या ज्योतिःशास्त्र या एका शाखेवर ग्रंथ करणारे पुष्कळ झाले. परंतु त्याच्या अनेक शाखांवर विचार करणारा ज्योतिषी याच्यानंतर दुसरा कोणी झाला नाही असे म्हटले असतां चालेल. आणि इतक्या प्राचीन कालीं असा मनुष्य आमच्या देशांत झाला हे मोठे भूषण आहे. परंतु त्याच्या जातकग्रंथाचा मात्र उपयोग पुढे आजपर्यंत पुष्कळ होत आला, तसा त्याच्या संहिताग्रंथाचा विचार व उपयोग फारसा कोणी केलेला दिसत नाही. त्याने घालून दिलेल्या दिशेने सृष्टपदार्थांच्या गुणधर्माचा विचार तसाच पुढें अव्याहत चालता तर आज युरोपियनांनी या कामांत आपणास मागें टाकिलें नसते. परंतु ती परंपरा पुढे चालली नाहीं हे आमच्या देशाचे दुर्भाग्य होय. श्रीषेण आणि विष्णुचंद्र. वराहाच्या नंतर आणि ब्रह्मगुप्ताच्या पूर्वी म्हणजे शके ४२७ आणि ५५० यांच्यामध्ये केव्हां तरी हे ज्योतिषी झाले. ह्यांचे ग्रंथ सांप्रत उपलब्ध नाहीत. सांप्रतचे रोमक आणि वासिष्ठ हे सिद्धांत यांचेच किंवा यांच्या ग्रंथांच्या आधाराने रचलेले असतील इत्यादि विचार पूर्वी केलाच आहे. ब्रह्मगुप्त. काल. हा आपल्या ब्राह्म स्फुटसिद्धांतांत ह्मणतो:श्रीचापवंशतिलके श्रीव्यायमुखे नृपे शकनृपाणां ॥ पंचाशत्संयुक्तैर्वर्षशतैः पंचभिरतीतैः ५५०॥७॥ ब्राह्मः स्फुटसिद्धांतः सज्जनगणितगोलवित्तीत्यै ॥ त्रिंशद्वर्षेण कृतो जिष्णुमतब्रह्मगुप्तेन ॥ ८ ॥ यावरून चापवंशांतील व्याघ्रमुख नामक राजा राज्य करित असतां, ब्रह्मगुप्तानें शक ५५० मध्ये हा ग्रंथ केला. ब्रह्मगुप्ताच्या पित्याचें नांव जिष्णु असें होतें.

  • ग्रहणाचे कारण भूछायाचंद्रप्रविष्ट राहु असें वराहमिहिर म्हणत नाही याबद्दल मात्र ब्रह्मगुप्ताने त्यास दोष दिला आहे, परंतु तो वास्तविक दोष नव्हे. आणि ब्रह्मगुप्ताचाही खरा उद्देश दोष देण्याचा नाहीं.