पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८१ ]

उच्चस्थानीं विराजमान व्हावें त्याच परमात्म्यानें- त्या तार्थांच्या तीर्थरूपानें- श्रीहरीने सुदाम्याचें पादोदक प्यावें काय ? ह्या भक्तवत्सलतेला, ह्या ब्रह्मण्यपणाला, ह्या मित्रप्रेमाला जगांत दुसरी तोडच नाहीं ! असो; त्यानंतर “ गंधालेपें धूपें दीपें पुष्पें ” इत्यादि करून प्रभूर्ती त्याची पूजा केली. व सुदामदेवास उकाड्याचा त्रास होऊं नये म्हणून ऋद्धिसिद्धि जिच्या दारांत 'वोळंगत' आहेत ती रुक्मिणी व्यजन- चामरे घेऊनि हाती शैव्या घाली वारा. " ह्या भाग्याला कांहीं सीमा आहे काय ? देव भक्ताचा किती अंकित असतो - भुकेला असतो - याचे प्रत्यंतर वाचकांनी येथें मनमुराद पाहून ध्यावें. असो. यानंतर मग त्यांच्या मागील - गुरुगृहीं असतांनाच्या गोष्टी सुरू झाल्या. गुरुगृहाहून निघाल्यापासून बापडा सुदामा दारिद्र्याच्या समुद्रांत वहावत गेला होता व कृष्णप्रभू सुखसागरांत तरंगत होते. दोघेही सध्यां दैविकयोगानें पुन्हां मित्रप्रेमाच्या नौकेंत एकत्र बसले होते. तेव्हां साहजीकच " हें सारें मजला आठवतें स्मरतें की तुज नाहीं ? म्हणून सांदीपनि गुरुच्या पत्नीनें काष्ठे आणायासी । पाठविलें विपिनाला स्मरतें तें माझ्या हृदयासी " असे ते बोलूं लागले. “ मित्रा ! ” श्रीकृष्ण बोलत होते " त्यावेळेस 'कालावांचूनि आला जल-धर, सुटला वात, अंधार झाला ' अशी भयंकर वृष्टी झाली व त्यावेळेस आपण ‘ वर्षे कांकडलों जळांत पडलों ' व मग ' प्रातःकालीं श्रीगुरु आला आम्हां शोधायाला ' तें तुला आठवतें ना ? अहाहा ! किती तें गुरुचें प्रेमळ व दयाळु हृदय ! " असो. फारा दिवसांनी भेटलेल्या त्या जिवलग मित्रांचीं याप्रमाणें प्रेमसंभाषणे झाल्या.वर मग " देव म्हणे सखया मज द्याया काय उपायन आजी । आणिलें असेल देउनिया तें वांछा पुरवीं माझी " तो प्रश्न ऐकून गरीब बापडा ब्राह्मण किती संकोचला असेल याची कल्पना त्याच्यासारख्या दरिद्र्यावाचून इतरास होणें नाहीं. " संकोचला अधोमुख बसला विप्र न बोले कांहीं. " पण मित्रप्रेमाचें भरतें आलेल्या आमच्या प्रभूस कुठलें राहवायला ? त्यानीं त्याच्या कांखेस हात घातलाच व ती पोह्याची पुरचुंडी बाहेर काढली. सुदाम्यास मेल्याहून मेल्यासारखं झालें. पण आमच्या भक्तवत्सल प्रभूचा आनंद पहा ! त्या पोह्याची एक मूठ तोंडात टाकून प्रभू म्हणतात, भूतात्म्याला मजला तर्पिति पोहे हे बहु फार । याहुनि न रुचे भुवनी बंधो अन्य उपायनसार."' अहाहा ! " देव म्हणाले " मित्रा ! किती हे गोड पोहे आहेत ! यावरून पंच पक्कान्नांची ताटें खरोखर ओवाळून टाकावत ! " असे म्हणून “ ऐसें स्तवुनि उपायन दुसरी मुष्टि श्रीपति उचली. " पण रुक्मिणीला तें कसचें पाहवतें !