पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ६८ ]

पण जिथें तिथें हा कारटा- हा गवळ्याचा पोर-मला आड येतो-मी एवढा हिंदुस्तानचा सम्राट असून माझा व माझ्या पक्षाचा हा कृष्ण जिथें तिथें पाणउतारा करतो हे शल्य जरासंधाच्या मनांतून गेलें नाहीं व परक्या कालयवनास मदतीस बोलावून पश्चिमेकडून कालयवनानें व पूर्वेकडून जरासंधानें मथुरेवर हल्ला चढवून दोघांच्या कात्रींत मथुरेचे व कृष्णाचे तुकडे उडवावेत असा त्या दुष्टानें प्रचंड बेत रचला व तो प्रत्यक्ष अमलांतही आणण्याचा घाट घालून तो मथुरेकडे येण्यासही निघाला. जरासंध आपणास अवध्य आहे तसाच कालयवनही अवध्य आहे हे श्रीकृष्ण जाणून होते व म्हणून त्यांचा काटा युक्तीनेच उपटला पाहिजे अर्से त्यांनी ठरवलें. यद्यपि त्यांच्या सैन्यांचा फडशा पाडण्यास ते पूर्ण समर्थ होते व त्याप्रमाणें आजवर त्यांनीं दोन तीनदां त्यांना माती चारलीही होती, तथापि केवळ आपल्यासाठी एखाया 'प्लेग' सारखां हा कायमचा 'प्लेग ' च - त्रासच - मथुरेस होऊन बसणार व ज्या रस्त्यावर आपल्यासाठीं गुलाल उधळला गेला तेथेंच निष्कारण रक्ताच्या चिळकांडया उडणार हा विचार मनांत येऊन प्रभूंनीं सर्व यादवांस सांगून ताबडतोब सर्वांनी आपले ठाणें तेथून हालवलें व पश्चिमेकडे आनर्त देशाजवळ समुद्राचे कांठीं कुशस्थळीं ह्या रम्य प्रदेशांत त्यांनीं द्वारकेची वसाहत केली. कालयवन पश्चिमेकडून चालून येत होता त्यास वार्टेतच गांठावा म्हणून कृष्णप्रभु घाईघाईनें निघाले व धोलपुराजवळ त्यास गांठून धोलपूरच्या डोंगरांत त्यास घेऊन जाऊन तेथें एका गुहेत निजलेल्या मुचकुंद राजर्षींकडून त्याचा वध करविला. झोपेतून जागे करणाराकडे पहातांच तो ज़ागा करणारा भस्म व्हावा असा देवासाठीं लढून थकून निजलेल्या त्या राजास देवांचा वर होता. कृष्ण त्याच गुहेत लपल्यावर कालयवन तेथें आला व निजलेला मुचकुंद कृष्णच आहे असें समजून त्यास त्याने लत्ताप्रहर केला. त्याबरोबर मुचकुंदांनीं डोळे उघडले व कालयवनाकडे पाहिले - कालयवन भस्म झाला !
 कालयवन मेला व कृष्णही यादवांसकट द्वारकेस जाऊन राहिला; मग आतां मधुरेवर स्वारी करण्यांत काय अर्थ आहे ? असे पाहून आमचे जरासंधमहाराजही परत मगध देशास गेले !
 कालयवनास मारून परत आलेल्या श्रीकृष्णानीं द्वारकेची अत्यंत रम्य मोडणी करून तिला प्रतिअमरावती-इंद्राची राजधानी बनवून आमचा ' द्वारकेचा राणा तेथें राहूं लागला. पण ऐन पंचविशीच्या घरांत असलेल्या व सर्व प्रकारच्या कीतीने