Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥ श्री ॥
उपसंहार.

 आहार, निद्रा, भय, इत्यादि गोष्टी तर निर्माण झालेल्या यच्चयावत् जीवांस सामान्यच आहेत. त्या दृष्टीनें मनुष्यजीव आणि विश्वांतील इतर प्राणी यांच्यांत कांही मोठासा फरक नाहीं. फरक आहे तो इतकाच की इतर प्राणी या गोष्टी त्याच्यांत जी गोडी आहे तिच्याकरितांच केवळ करि- तात. म्हणजे ते याच गोष्टीकरितां जगतात व जगतात म्हणून या गोष्टी करितात. तशी माणसाची स्थिति नाही. या गोष्टींत जी गोडी आहे तिच्याच करितां या न करितां जगावयाचें साधन म्हणून या गोष्टी करावयाच्या व दुसऱ्या कांही तरी हेतूकरितां जगावयाचें असें त्यानें मनांत आणल्यास त्याला करितां येतें. दुसरा मोठा फरक असा आहे कीं, या चतुष्टयांतील मुख्य गोष्ट जी आहार तो इतर प्राण्यांना निसर्गतः उप्तन्न झालेला असेल तसाच फक्त थोड्याशा कष्टानें मिळवून सेवन करावा लागतो. परंतु मनुष्याला मनांत आणल्यास तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे निसर्गाच्या साहाय्याने नवीन उत्पन्न करिता येतो व सेवन करितां येतो. म्हणजे एकादी विशेष इच्छा अथवा ध्येय मनांत बाळगण्याची आणि तदनुरूप असें कर्म करण्याची शक्ति त्याच्यांत आहे. म्हणूनच आहारनिद्रादिक सर्व शरीरधर्म केवळ तज्जन्य सुखाकरितांच न करितां कांहीं तरी विशिष्ट ध्येयाकरिता करण्याची व त्या ध्येयाला अनुसरून अखंड कर्म करण्याची त्याचेवर निसर्गतःच जबाबदारी आहे. मानवदेह व जन्म हा कर्म करण्याकरितांच आहे. कारखान्यांतून शक्य तितका जास्त माल ( out-turn ) बाहेर पाडण्याची जबाबदारी जशी एंजि- नियरवर आहे, तशीच जबाबदारी या देहासंबंधानें जीवावर आहे. देशकालप्राप्त व स्वतःच्या व्यक्तिविशिष्टत्वाला अनुरूप अशा भावनांना सजीव राखणें, व कोणत्याही प्रकारची वंचकता अगर कातरता न करितां, त्यांना पराकाष्ठेचें मूर्त स्वरूप देण्यासाठी अखंड साक्षेप करीत राहणें यांतच मानवाचें मनुष्यत्व आहे. असें न करितां म्हणजे अशा कांही उदात्त ध्येयाकरितां न जगतां जर तो केवळ जगावयाचें म्हणून जगूं लागला व जगण्याकरितांच खाऊं पिऊं लागला तर