प्रदेशांत राहत होता. तोहि आपल्या दोनशें जटाधारी शिष्यांसहवर्तमान बुद्धाचा शिष्य झाला.
ह्या सर्व पूर्वी जटिल असलेल्या भिक्षुसंघासह भगवान् बुद्ध राजगृह नगरास गेले. तेथें त्या वेळीं बिंबिसार राजा राज्य करीत होता. तो बुद्धाच्या आगमनाचें वर्तमान ऐकून मोठ्या समुदायासह बुद्ध राहत होते तेथें गेला. त्या वेळीं लोकांना बुद्ध कश्यपाचा गुरु किंवा काश्यप बुद्धाचा गुरु अशी शंका उत्पन्न झाली. काश्यप जेव्हां बुद्धाच्या पायां पडला तेव्हां लोकांची ही शंका दूर झाली. बिंबिसार राजाने वेळुवन नांवाचें उत्तम उद्यान बुद्धप्रमुख भिक्षुसंघास राहण्यासाठीं दान दिलें.
ह्या उद्यानांत भिक्षुसंघासह बुद्ध भगवान् राहत होते. त्या वेळीं राजगृहाजवळ संजय नांवाचा प्रसिद्ध परिव्राजक राहत होता. सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे ब्राह्मण संजयाच्या शिष्यांत प्रमुख होते. त्या दोघांनीं ज्याला प्रथम शांतिपद सांपडेल त्यानें तें इतरास सांगावें असा बेत केला होता. एके दिवसीं अस्सजि राजगृहांत भिक्षेसाठीं फिरत असतां सारिपुत्ताने त्याला पाहिलें. अस्सजीची आनंदी आणि वैराग्ययुक्त मुद्रा पाहून सारिपुत्ताच्या मनांत त्याजविषयीं अत्यंत आदरभाव उत्पन्न झाला. तो अस्सजीच्या मागोमाग राजगृहांतून बाहेर पडला, व वाटेंत त्यानें अस्सजीस गांठलें. अस्सजीला कुशल प्रश्नादि करून झाल्यावर सारिपुत्त ह्मणाला:- "आयुष्मन्, तुझी मुखचर्या प्रफुल्लित दिसत आहे. तुझा गुरू कोण? कोणत्या धर्मास अनुसरून तूं वागतोस?"
अस्सजि:- आयुष्मन् महाश्रमण शाक्यपुत्र (बुद्ध) माझा गुरु आहे. त्याच्या धर्माप्रमाणें मी वागतों.