Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/११७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १०७ )

 ७ सम्यक् स्मृति:- शरीर अपवित्र पदार्थांचें बनले आहे हा विवेक जागृत ठेवणें, शरीरांतील सुखदुःखादि वेदनांचें वारंवार अवलोकन करणें, खचित्ताचें अवलोकन करणें, आणि कार्यकारणपरंपरा इत्यादि तात्त्विक गोष्टींचें चिंतन करणें, ह्या चार प्रकारांनी चित्ताला जागृत ठेवणें, याला ह्मणतात सम्यक् स्मृति.
 ८ सम्यक् समाधि:- सगळ्या कामवासनांचा निरोध करून व इतर दुष्ट मनोवृत्तींचा निरोध करून योगी वितर्क आणि विचार यांनी युक्त आणि विवेकापासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें प्रथम ध्यान संपादन करितो; वितर्क आणि विचार हे शांत झाल्यावर जी चित्ताची प्रसन्नता, जी चित्ताची एकाग्रता, तिनें युक्त, वितर्कविचारविरहित व समाधीपासून उत्पन्न झालेल्या प्रीतीनें आणि सुखानें युक्त असें द्वितीय ध्यान संपादन करितो; प्रीतीच्या त्यागानें तो उपेक्षायुक्त होतो, व जागृत (स्मृतिमान्) होत्साता समाधिसुखाचा अनुभव घेतो, त्याला आर्य जन उपेक्षायुक्त, स्मृतिमान् आणि सुखी असें ह्मणतात, अशा प्रकारचें तो तृतीय ध्यान संपादन करितो; सौमनस्य आणि दौर्मनस्य यांचा पूर्वीच नाश झाल्यावर सुख आणि दुःख यांचा निरोध करून तो सुखदुःखविरहित व उपेक्षा आणि जागृति (स्मृति) यांनी परिशुद्ध असें चतुर्थ ध्यान संपादन करितो. ह्याप्रमाणें चार ध्यानें संपादन करणे याला सम्यक् समाधि असें म्हणतात[].
 बुद्ध भगवंतांनी या आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग असें म्हटलें आहे. त्याचें प्रत्येक अंग दोन अंतांच्या मध्ये आहे. उदाहरणार्ध, चैनी लोकांची दृष्टि म्हटली म्हणजे खावें प्यावें मजा मारावी. हा दृष्टीचा एक अंत. तापसी लोकांची दृष्टि म्हटली म्हणजे व्रतांनी शुद्धि, तपानें शुद्धि, देहदंडनानें शुद्धि हा दुसरा अंत. पहिला अंत चैनीचा आणि दुसरा अंत देहदंडनाचा. यांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे चार आर्यसत्यांचें यथार्थ ज्ञान. चैनी लोक म्हणतात वाटेल ते संकल्प संकल्पावे. तापसी म्हणतात संकल्पांचा समूळ नाश करावा. या दोन अंतांच्या मधला मार्ग म्हटला म्हणजे सम्यक् संकल्प. याप्रमाणे बाकी अंगांचीहि मध्यवर्तिता जाणावी.





  1. हीं ध्यानें संपादण्याचा मार्ग दुसऱ्या व्याख्यानांत सांगितला आहे.