Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/११६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १०६ )

कीं नाहीं? अंगांत शिरलेल्या शल्यापासून वेदना होतात, हे समजलें, परंतु तें शल्य सुरक्षितपणे काढण्याला जर उपाय माहीत नाहीं, तर नुसतें एवढं समजण्यापासून काय फायदा? ह्मणून दुःखाचा निरोध करण्याला उपाय ह्या चवथ्या आर्यसत्यांत सांगितला आहे. हा उपाय मला ह्मणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय.
 १ सम्यक् दृष्टि:- दुःखाचें ज्ञान, दुःखसमुदयाचें ज्ञान, दुःखनिरोधाचें ज्ञान, आणि दुःखनिरोधगामी मार्गाचं ज्ञान, याला सम्यक् दृष्टि असें ह्मणतात. जग अनित्य ह्मणजे बदलणारें आहे, प्रपंच दुःखमय आहे, आणि आत्मा ह्मणून अविनाशी आणि अविकारी असा पदार्थ नसून कर्मानुसार बदलणारा आहे, अशा यथार्थ ज्ञानाला सम्यक् दृष्टि असें ह्यटलें असतां चालेल. कारण अशा ज्ञानानेंच चार आर्यसत्यांचे ज्ञान होणें शक्य आहे.
 २ सम्यक् संकल्प:- नैष्कर्म्य संकल्प ह्मणजे एकांतवाससुखाची आवड, अव्यापादसंकल्प ह्मणजे प्राणिमात्रांवर शुद्ध प्रेम, आणि अविहिंसासंकल्प ह्मणजे दुसऱ्यास किंवा आपणास त्रास होऊं नये अशी इच्छा. या तीन संकल्पांला सम्यक् संकल्प ह्मणतात.
 ३ सम्यक् वाचा:- खोटें न बोलणें, चहाडी न करणें, कठोर शब्द न उच्चारणें, आणि वृथा भाषण न करणें ह्यांला सम्यक् वाचा ह्मणतात.
 ४ सम्यक् कर्मान्त (कर्म):- प्राणघात न करणें, चोरी न करणें व परदारगमन न करणें, यांला सम्यक् कर्मान्त ह्मणतात.
 ५ सम्यक् आजीव:- वाईट मार्गानें आपली उपजीविका न करितां सन्मार्गानेच ती करणें, याला ह्मणतात सम्यक् आजीव.

 ६ सम्यक् व्यायाम:- जे वाईट विचार मनांत आले नसतील, त्यांना उत्पन्न होण्यास सवड न देण्याविषयीं प्रयत्न, जे वाईट विचार मनांत उद्भवले असतील, त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न, जे सुविचार मनांत उद्भवले नसतील, ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न, व जे सुविचार मनांत उद्भवले असतील, ते वाढवून त्यांना पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न, या चार मानसिक प्रयत्नांला सम्यक् व्यायाम म्हणतात.