Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/११४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १०४ )

वेळींहि प्राण्याला दुःख होतें; ह्या आयुष्यामध्यें शोकाचे अनेक प्रसंग येतात, तेहि दुःखकारक; अप्रिय पदार्थांशी किंवा प्राण्याशी संबंध आला ह्मणजे तोहि दुःखकारकः प्रियपदार्थांचा किंवा प्राण्यांचा वियोग झाला, तरी तो दुःखकारक होतो. एखाद्या वस्तूची इच्छा करून ती न मिळाली ह्मणजे त्यापासूनहि दुःख होतें. संक्षेपानें सांगावयाचें ह्यटलें ह्मणजे पांच उपादानस्कंध (वासनायुक्त स्कंध) हे दुःखकारक आहेत. याप्रमाणें धार्मिक मनुष्यानें दुःख सत्याचें ज्ञान संपादिलें पाहिजे.
 दुःखसमुदय:- ह्या सगळ्या दुःखाचें कारण काय? कोणी ह्मणतात, दुःख हा आत्म्याचा धर्म आहे, कोणी ह्मणतात, दुःख जगताच्या कर्त्यानें किंवा आपणाहून भिन्न अशा कोणत्यातरी व्यक्तीनें उत्पन्न केलें असावें; परंतु बुद्ध भगवान् ह्मणतात दुःख हा आत्म्याचा धर्म नव्हे किंवा तें दुसऱ्या कोणीतरी उत्पन्न केलें आहे, असेंहि नव्हे, तर तें कार्यकारण नियमानें उत्पन्न झालें आहे. तृष्णा आहे ह्मणून दुःख आहे. तृष्णा नाहीं तर दुःखहि नाहीं. तृष्णा ह्मणजे अतृप्ति. ती तीन प्रकारची. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. कामतृष्णा ह्मणजे चैनीच्या पदार्थांची तृष्णा. ह्या तृष्णेपासून जगाच्या दुःखांत मोठी भर पडली आहे. "कामतृष्णेनें क्षत्रिय क्षत्रियांबरोबर भांडतात, ब्राह्मण ब्राह्मणांबरोबर भांडतात, पिते पुत्रांबरोबर भांडतात, पुत्र पित्यांबरोबर भांडतात, आणि आप्त आप्तांबरोबर भांडतात. ह्या चैनीसाठींच हीं सारी भांडणे होतात[]." बरें भांडण करून एखाद्यानें चैनीच्या पदार्थांचा मोठा वांटा मिळविला, तरी त्यापासून त्याला सुख होत नाहीं.

अबला नं बलीयन्ति महन्ते नं परिस्सया ।
ततो नं दुःखमन्वेति भिन्नं नावमिवोदकं[]

 "दुर्बळ लोक त्याचा मत्सर करितात; कामक्रोधादि अभ्यंतर व अग्नि चोर इत्यादि बाह्य शत्रू त्याला तुडवितात; आणि त्यामुळे


  1. महादुक्खक्खंधसुत्त, मज्झिमनिकाय.
  2. सुत्तनिपात, कामसुत्त.