Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १०३ )



परिशिष्ट ३.
(चार आर्यसत्यें आणि आर्य अष्टांगिक मार्ग.)

चतुन्नं अरियसच्चानं यथाभूतं अदस्सना ।
संसरितं दीघमद्धानं तासु तास्वेव जातिसु ॥
तानि एतानि दिट्ठानि भवनेत्ति समूहता ।
उच्छिन्नमूलं दुक्खस्स नत्थि दानि पुनब्भवोति ॥

 "चार आर्यसत्यांचें यथाभूत ज्ञान न झाल्यामुळे दीर्घ काळपर्यंत त्या त्या योनीत जन्मलों. परंतु आतां त्या सत्यांचे ज्ञान झाले; व त्यामुळें तृष्णेचा नाश झाला. दुःखाचें मूळ समूळ नष्ट झालें. आतां आणखी पुनर्जन्म राहिला नाहीं."

(महापरिनिब्बाणसुत्त)

 त्रिपिटकांत चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. हीं चार आर्यसत्यें बौद्धधर्माचा पाया आहेत असें ह्मटलें असतां चालेल. बुद्ध भगवंतांनी प्रथमतः वाराणसीत पंचवर्गीय भिक्षूंना ह्या चार आर्य सत्यांचाच उपदेश केला. हा उपदेश पहिल्या व्याख्यानाच्या शेवटीं मीं दिलाच आहे. ह्या उपदेशाची अनेक सुत्तांतून विस्तृत व्याख्या केली आहे. अट्ठकथाकारांनीहि यावर विस्ताराने टीका लिहिली आहे. पहिल्या व्याख्यानांतील चार आर्यसत्यांचें वर्णन धम्मचक्कपवत्तनसुत्तास अनुसरून केल्यामुळें अतिसंक्षिप्त झालें आहे. ह्या आर्यसत्यांचा आमच्या वाचकवर्गास विशेष बोध व्हावा, ह्मणून त्या अतिसंक्षिप्त वर्णनाचा इतर सुत्तांतील वर्णनाच्या आधारें थोडा विस्तार करीत आहे.
 दुःख:– दुःख हे पहिलें आर्यसत्य. ह्या जगांत दुःख आहे हे मनुष्यानें प्रथमतः जाणलें पाहिजे. ज्याला दुःख काय आहे हे ठाऊक नाहीं, त्याची बुद्धि धर्माकडे वळणे कठीण. ह्या प्रपंचांत दुःख आहे, असें वाटल्यावरूनच सर्वपंथांच्या लोकांना परमार्थाविषयीं प्रयत्न करण्याची बुद्धि होते. दुःख कोणतें? जन्म दुःखकारक ह्मणजे मूल जन्मतांच दुःख बरोबर घेऊन येतें. ह्मातारपणहि दुःखकारक; मरते-