पान:बालहक्क (Balhakk).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १३ बाल विवाह होत असल्यास काय कराल ?
उत्तर:बाल विवाह ठरल्याची माहिती मिळताच ज्या जोडप्याचा बालविवाह होणार आहे

■ त्या दोघाही मुलगा आणि मुलीचा शाळेचा निर्गम उतारा ताब्यात घ्यावा. जन्मतारीख पाहून वयाची शहानिशा करावी.
■ सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने संबंधीत कुटुंबियांना बोलावून घेऊन लग्न ठरल्याची शहानिशा करुन घ्यावी.
■ सदर लग्न करण्यामागची कारणे समजून घ्यावीत व दोन्ही कडील कुटुंबियांचे समुपदेशन करावे.
■ लग्न रद्द करण्याबाबत किंवा पुढे ढकलण्याबाबत विभागातील पोलीस ठाण्यामध्ये नेऊन कायदेशीर भाषेत दोन्ही कुटुंबाकंडून समजपत्र लिहून घ्यावीत.
■ दिलेल्या समज पत्रानुसार वर्तन न केल्यास होणाऱ्या परिणामाची कडक शब्दात जाणीव द्यावी.
■ मुलगी पूर्ववत शाळा कॉलेज मध्ये जात आहे याची खात्री करून घ्यावी.
■ दुसऱ्या तालुक्यात / जिल्ह्यात जावून लग्न लागणार नाही याची दक्षताची जबाबदारी कृती दलाकडे सोपविण्यात यावी.

 एवढी सगळी काळजी घेऊन ही लग्न लागल्यास संबंधितावर बाल विवाह प्रतिबंधक कायद्यानुसार ग्रामसेवकांनी,अंगणवाडीताई व सरपंच यांच्या मदतीने गुन्हा दाखल करावा आणि संबंधितांवर कडक कारवाई होईल यासाठी दक्ष रहावे.

 गावात किंवा पंचक्रोशीत पुन्हा असे कोणी धाडस करणार नाही असा वचक निर्माण करावा.

 अशा पध्दतीची कारवाई करीत असताना ग्राम बाल संरक्षण समितीने घाबरण्याचे कारण नाही. शासन निर्णयानुसार अस्तित्वात आलेल्या एका कायदेशीर समितीचे सरकारी सदस्य म्हणून आपण कायद्याच्या अंमलबजावणीचे काम करीत आत्यामुळे अशा सदस्यांवर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. गरज वाटल्यास कारवाई दरम्यान ग्राम बाल संरक्षण समिती प्रचलित कायद्यानुसार पोलीस संरक्षण मागू शकते.

१४