पान:बालहक्क (Balhakk).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रश्न १०. बालकांवर परिणाम करणा-या प्रमुख समस्या कोणत्या?
उत्तर: बाल विवाह, अनैतिक व्यापार, बालकामगार, बालकांचे लैंगिक शोषण या शासन निर्णय कलम ब पोट कलम २ नुसार मुख्य समस्या बालकांना भेडसावणा-या आहेत.
 * बालविवाह
 ३०% विवाह हे आपल्या देशात बाल विवाह असतात. जगभरातील होणा-या बालविवाहांमध्ये सर्वात अधिक बाल विवाह हे भारतात होतात. बालविवाहामुळे अकाली लैंगिक जीवन आणि संसाराचे ओझे बालकांवर लादले जाते. शिक्षणामध्ये खंड पडतो. पर्यायाने व्यक्तीमत्वाचा सर्वांगिण विकास थांबतो.
 * बालकांचा अनैतिक व्यापार :
अनैतिक व्यापारामुळे बालक-बालिकांचे लैंगिक शोषणासाठी आणि अतिरेकी कारवायांसाठी, व्यसनाच्या अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी वापर केला जातो. भयंकर अशा गुन्हेगारीच्या जगतात बालकांना पळवून नेवून वापरले जाते. जगामध्ये (एक) शस्त्रास्त्रे, (दोन) अंमली पदार्थांची विक्री आणि (तीन) मानवी शरीराचा अनैतिक व्यापार या तीन व्यवसायात कोट्यावधी डॉलर्समध्ये उलाढाल केली जाते. बालक, बालिकांना पळवून नेवून विक्री करणा-या टोळ्यांचा पर्दाफाश करणे आणि अशा टोळ्यांपासून बालकांचे संरक्षण करणे, दिवसेंदिवस अवघड होत आहे.
 * बाल कामगार :
 कापूस वेचणे, मोळी बांधणे, वाढे गोळा करणे, पाणी आणणे, जळण गोळा करणे, लहानगी भावंडे सांभाळणे, स्वयंपाकात मदत करणे, कपडे धुणे ही आणि अशी अनेक प्रकारची घरगुती किंवा व्यवसायातील कामे बालकांकडून करुन घेतली जातात. वळण लावण्याच्या नावाखाली मुलींचे बालकामगार म्हणून खूप शोषण केले जाते. शासन स्तरावर वीट भट्टीवरील, बांधकामावरील, रस्ता कामावरील अशा बालकांची बाल कामगार म्हणून नोंदही आढळत नाही. हे बाल कामगार स्वस्त पडतात आणि अधिक काम करतात म्हणून मालक लोक अशा बाल कामगारांना कामावर ठेवतात.