Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५


 ह्या गोष्टींची अंगभूत अशी दुसरी एक गोष्ट ही आहे कीं, ज्याप्रमाणें ह्या जगांतील जड पदार्थाचा, ह्मणजे त्यांच्या परमाणूंचा, नाश असा कधीं होत नाहीं, त्याप्रमाणें या जगांतील कोणत्याही शक्तीचा नाश होत नाहीं. उंचावरून दगड खालीं पडला तर तो ज्या जागेवर आपटतो, त्या जागेवर उष्णता उत्पन्न होते; त्याप्रमाणेंच आपण हात जोरानें फिरविला, तर हवेंत लाट उत्पन्न होऊन, तिचा जो भाग आसपासच्या पदार्थांवर आदळतो त्या भागाच्या मानानें त्या पदार्थात उष्णता किंवा आंदोलन उत्पन्न होऊन बाकीचा भाग हवेंत पसरत जातो.

 पृथ्वी रोजच्या रोज उन्हानें इतकी तापते, त्या उष्णतेचा नाश होत नाहीं. समुद्रावर पडलेल्या उन्हाच्या योगानें तेथल्या पाण्याची वाफ होऊन ती आकाशांत जाते, आणि तेथें तिचे ढग होतात. ह्मणजे, सूर्याच्या उष्णतेच्या शक्तीचा कांहीं भाग त्या ढगांत गुप्त होऊन राहातो. आणि पावसाच्या वेळीं ती शक्ति पुनः व्यक्त होते. नद्यांस पूर येतात, झाडेंघरें वाहून जातात, आणि डोंगरावर पडलेल्या पावसाच्या योगानें जे धबधबे उत्पन्न होतात, त्यांच्या साह्यानें पाणचक्कया चालवितां येतात. ह्मणून, पाणचक्कीच्या गतींत सूर्याची उष्णता ह्या शक्तीचें रूपांतर दृष्टीस पडतें, असें ह्मटलें पाहिजे. जमिनीवर पडलेल्या उन्हानें हवा तापून वर चढते, आणि तिच्या जागीं दुसरी हवा येऊन घुसतांना वादळें वगैरे होतात. ह्मणजे, सूर्याची उष्णता ह्या शक्तीचें तापरूप स्वरूप जाऊन, तिला गतिरूप स्वरूप प्राप्त होतें. आपण एका पदार्थावर दुसरा पदार्थ घांसतो तेव्हां, किंवा कांतकाम करणारे लोक एकादा पदार्थ