इ. स. १८१८ सालीं पेंढाऱ्यांचे पुढारी पकडून त्यांचे बंड मोडून टाकिलें होते; परंतु त्यांचा अवशेष राहिलेला भाग ग्वाल्हेर संस्थानच्या सरहद्दीवर लपून छपून अद्यापि हल्ले करीत असे व संस्थानच्या प्रजेस फार त्रास देत असे. त्याचप्रमाणें, नीचतम व कपटपटु ठग लोक हे आपल्या अधमपणाच्या घातकी व निर्दय कृतींनीं प्रजेस अत्यंत पीडा देत असत. ह्या सर्वांचा शोध लावून व पाठलाग करून त्यांचें पारिपत्य करणें फार आवश्यक होतें. त्या कामीं ब्रिटिश राज्यांतील कर्नल स्लीमन, कर्नल म्याक्लौड वगैरे मोठमोठे अधिकारी, सर्व संस्थानांतील पोलिटिकल एजंटांचे साहाय्य घेऊन, एकसारखे झटत होते. बायजाबाईसाहेबांनी त्यांस उत्तम प्रकारची मदत करून, स्वतंत्र रीतीनें व त्यांच्या साहाय्यानें, ह्या दुष्ट लोकांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. ठग लोकांस ग्वाल्हेर संस्थानचे नौकर लोक देखील पुष्कळ अनुकूल होते; परंतु बायजाबाईसाहेबांनीं आपले सरसुभे नारायणराव ह्यांस सक्त ताकीद करून, कर्नल म्याक्लौड ह्यांस चांगली मदत देवविली; व स्वतःच्या राज्यांतील ठगांचा मागमूस काढवून त्यांस कडक शिक्षा दिल्या.१.[१]
- ↑ १ ठग लोकांचे बंड मोडण्याचे कामीं वायजाबाईसाहेब ह्यांनीं मदत केली अशाबद्दल कर्नल हर्वे ह्यांच्या इ.स.१८६६ सालच्या रिपोर्टांत पुढील उल्लेख सांपडतोः-
"In 1833, when Mr, F. D. Macleod, Assistant General Superintendent, had visited Gwalior, he reported to the Agent to the Governor-General, that during his entire stay in that territory he experienced the greatest attention, and that great willingness to co-operate with the measures of the British Government was displayed by Her Highness the Baiza Bai and by her Suba, Narayan Rao, who was the principal organ of communication with him; also that he had no occasion to apply for assistance which was not promptly afforded. ... ... ... ... Gwalior Durbar may be considered to have lent its co-operation in our measures from the period of Mr. Macleod's visit to Gwalior, viz. 1833."
The Sovereign Princes and Chiefs of Central India. Vol. I.