Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९

 कर्नल जॉन बॅप्टिस्ट फिलोजः—हा शिंदे सरकारच्या दरबारामध्यें "जॉन बत्तीस" ह्या नावानें प्रसिद्ध आहे. हा जातीचा फराशीस होता. ह्यानें दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दींत अनेक लढाया मारून फार प्राबल्य मिळविलें होतें. हा शूर, धाडशी व प्रसंगावधानी असल्यामुळें ह्याची शिंद्यांच्या दरबारांत बरीच छाप बसली होती. ह्यानें केरोली, चंदेरी, राघोगड, बहादुरगड, लोहपाड वगैरे ठिकाणच्या रजपूत व बुंदेले राजांवर स्वाऱ्या करून व त्यांना जेरीस आणून, त्यांचा प्रांत काबीज केला होता. परंतु हा इसम स्वार्थसाधु असल्यामुळे दौलतराव शिंद्यांची ह्याजवर गैरमर्जी झाली; व त्यांनी त्यास इ. स. १८१७ मध्ये ग्वाल्हेरीस आणून सक्त नजरकैदेंत ठेविलें होते. पुढें ह्यानें, दौलतरावांचे मुख्य खजानची किंवा फडणीस गोकुळ पारख ह्यांजकडे संधान लावून, इ. स. १८२५ साली आपली सुटका करून घेतली. तेव्हांपासून हा धाडशी व महत्वाकांक्षी सरदार मोकळाच होता. बायजाबाईसाहेबांनीं ह्यास मोकळा ठेवून उपयोगी नाहीं असे मनांत आणून, त्यास दरबारांत हजर राहण्याची परवानगी दिली, व सैन्याच्या एका छोट्या पथकाचा अधिकार दिला. ह्या पुरुषाने पुढे ग्वाल्हेर दरबारांतील राजकारणांत चांगलाच प्रवेश केला व तेथे वर्चस्व संपादन केलें.

 मेजर जोसेफ आलेक्झांडरः---ह्यास "जोशी शिकंदर" किंवा "सवाई शिकंदर" असे ह्मणत. हा पूर्वीं जान बत्तिसाच्या सैन्यामध्यें एक लहानसा सेनाधिकारी होता. परंतु जान बत्तीस ह्याजवर मध्यंतरीं दौलतराव शिंदे ह्यांची इतराजी झाली व त्याचें सेनाधिपत्य त्यांनीं काढून घेतलें, त्या वेळीं ह्यास सर्व कंपूंचें आधिपत्य देण्यात आले. तें त्याजकडे पुष्कळ वर्षें होते. पुढे इ. स. १८२१ साली, बुंदेलखंडांतील एका राजाचें व जोशी शिकंदर ह्याचें भांडण झालें. त्या वेळीं ब्रिटिश सरकार मध्यें पडून त्यांनी शिंदे सरकाराकडून त्यास ग्वाल्हेरीस परत बोला-