पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६८



कृष्णरावांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव अमृतराव हे अज्ञान व अल्पवयी असल्यामुळें दाजीबा हेच सर्व काम पाहत असत.

 आत्माराम शिवरामबाबा वांकडेः–ह्यांचे पूर्वज लक्ष्मणराव वांकडे हे पुण्याचे रहिवासी असून, महादजी शिंदे ह्यांचे बरोबर उत्तर हिंदुस्थानांत आले होते. ह्यांच्याकडे प्रथम पोतनिशीचें काम होतें. पुढें कांहीं कारणामुळें ते त्या कामावरून दूर झाले. त्यांचे पश्चात् दौलतराव शिंदे ह्यांनीं तात्या पागनीस ह्यांजकडे तें काम सांगितलें. ते मृत्यु पावल्यानंतर लक्ष्मणराव ह्यांचे नातू आत्मारामपंत ह्यांस तें काम सांगितले. दोन वर्षेंपर्यंत ते काम त्यांनी उत्तम रीतीने बजावल्यामुळें सर्जेराव घाटगे ह्यांची त्यांजवर फार मेहेरबानी जडली, व त्यांनी त्यांस खासगी दिवाण नेमिलें. पुढें सर्जेराव इ. स. १८१० सालीं मृत्यु पावल्यानंतर कांहीं दिवस ते स्वस्थ होते. परंतु ते चतुर व दूरदर्शी मुत्सद्दी असल्यामुळें दौलतराव शिंद्यांची त्यांच्यावर पुनः कृपा जडली, व त्यांच्या दरबारामध्यें त्यांचा पगडा बसला. दौलतरावांच्या पश्चात् बायजाबाईसाहेबांनीं त्यांस आपले खासगी दिवाण नेमिलें. ते बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत आत्माराम पंडित ह्या नांवाने प्रसिद्धीस आले.

 कर्नल जेकबः—हा आर्मीनिया प्रांतांतील मूळचा राहणारा इसम स्वपराक्रमानें दौलतराव शिंदे ह्यांच्या पदरीं योग्यतेस चढला. ह्याच्याकडे १३ पायदळ पलटणी, ४०० घोडेस्वार, व एकंदर ५२ तोफा होत्या. ह्या सैन्याची व्यवस्था त्यानें फार चांगली ठेविली होती व त्याचा पगार वगैरे वेळच्यावेळीं तो देत असे. त्याबद्दल कर्नल जेकब ह्यांस स्वतंत्र प्रांत तोडून दिला होता. बायजाबाईसाहेबांनीं दौलतराव शिंदे ह्यांच्या व्यवस्थेंत कांहीं फेरफार न करितां, कर्नल जेकब ह्याजकडे पूर्वींप्रमाणे जायदाद व अधिकार कायम ठेविले.