पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.

.

 हिंदुस्थानच्या प्राचीन व अर्वाचीन इतिहासामध्यें ज्या राजकारणी, सद्गुणी, विदुषी, चतुर, साहसी, शूर, स्वाभिमानी, तेजस्वी, उदार, आणि धार्मिक अशा स्त्रिया होऊन गेल्या, त्यांची संख्या पुष्कळ आहे. परंतु त्यांच्या चरित्रांच्या अभावामुळे त्यांचे यश अगदी अप्रसिद्ध व संकुचित राहिले आहे. ह्या योगाने आमच्या राष्ट्रांतील स्त्रिया अगदी कमी प्रतीच्या लेखण्याचा प्रघात पडला आहे. परंतु वस्तुस्थिति तशी नाहीं. आमच्या देशांत “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः" अशा प्रकारची पूर्वीं स्त्रियांविषयी सन्मानबुद्धि असून, स्त्रियाही आपल्या उत्तम गुणांनी ह्या सन्मानास पूर्णपणे पात्र होत्या. परंतु त्यांची उज्ज्वल चरित्रे किंवा गुणमहिमा आमच्या नेत्रांसमोर नसल्यामुळे त्यांचे सद्गुण, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांची कर्तृत्वशक्ति ह्यांविषयीं आमच्या मनांत यत्किंचितही प्रकाश पडत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीं ‘न स्त्रीस्वातंत्र्यमर्हती' असला अनुदार विचार मनांत ठाम बसून, त्यांना बंद्या गुलामाप्रमाणे वागविण्याची स्वाभाविक प्रवृत्ति पडली आहे. त्याकारणाने त्यांच्या शिक्षणाबद्दल व उन्नतीबद्दल निष्काळजीपणा उत्पन्न होऊन आमच्या संसाररथाचे एक चक्र अगदी लुळे पडले आहे व समाजाची व राष्ट्राची फार हानि झाली आहे. म्हणजे, पर्यायेंकरून, चरित्रप्रकाशनाच्या योगाने उत्तम गुणांचे प्रतिबिंब मनावर चांगल्या रीतीने उमटून, सत्कृत्याविषयी प्रेरणा-सद्गुण आणि सत्कृत्त्याविषयी आसक्ति ही उत्पन्न होऊन स्त्रीपुरुषांस जो अप्रतिम लाभ व्हावयाचा तो आमच्या देशांत चरित्रप्रकाशनाच्या अभावामुळें अगदी नाहीसा झाला आहे, असें म्हटलें असतां फारसा बाध येणार नाहीं.

 पौराणिक कालापासून आमच्या देशांतील प्रसिद्ध स्त्रियांच्या चरित्रांचे संशोधन केले, तर ती चरित्रे कोणत्याही राष्ट्रांतील तत्कालीन स्त्रियांच्या चरित्रांपेक्षा कमी मनोरम अथवा कमी सुरस आहेत असें म्हणतां येणार नाहीं. ग्रीस देशांतील सॅफो, ॲस्पाशिया, लेस, ऱ्हीन, टिमॉक्सेना ह्या प्राचीन स्त्रीयांची चरित्रे घेतली, किंवा रोमन राष्ट्रांतील लुशिया, व्हर्जिनिया, कॉर्नि