पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०

झाला. नंतर जयसिंगराव हे इ. स. १८१५ चे सुमारास ग्वाल्हेरीस गेले. तोंपर्यंत हे दक्षिणमहाराष्ट्रांतील आपल्या कागलच्या जहागिरीचा उपभोग घेत होते. कोल्हापुरचे महाराजांनीं ह्यांस 'हिंदुराव' व 'वजारतमाब' असे किताब दिले होते. त्यावरून हे 'हिंदुराव' ह्याच नांवाने प्रसिद्ध होते. हे बायजाबाईसाहेबांचे सख्खे बंधु असल्यामुळें व बायजाबाईसाहेबांचें दौलतराव शिंदे ह्यांचेवर चांगलें वजन असल्यामुळें हे ग्वाल्हेरच्या दरबारांत तेव्हांच मोठ्या योग्यतेस चढले. हे स्वभावतः मोठे बाणेदार व तेजस्वी असून, स्वातंत्र्यप्रियता हा गुण त्यांचे अंगीं फार वसत असे. त्यामुळें संस्थानांतील हांजी हांजी करणाऱ्या लोकांवर त्यांची तेव्हांच छाप पडत असे. दौलतराव शिंदे ह्यांची हिंदुरावांवर पुढें पुढें इतकी मेहेरबानी जडली कीं, त्यांनी त्यांस १,५०,००० रुपयांची जहागीर बक्षीस दिली, व आपल्या दरबारांत त्यांस पहिल्या प्रतीचे सरदार केलें. एवढेंच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक हिताहिताच्या गोष्टीबद्दलही ते काळजी घेऊं लागले. हिंदुराव ग्वाल्हेरीस राहूं लागल्यानंतर इ. स. १८२५ सालीं, कागलची जहागीर कोल्हापुरच्या महाराजांनी पुनः जप्त केली; व कागलच्या किल्यावर स्वसैन्यानिशीं चालून जाऊन तो हस्तगत केला; आणि हिंदुरावांच्या मातुश्रींस व इतर कुटुंबीय मंडळीस तेथून घालवून दिले. त्या वेळीं दौलतराव शिंदे ह्यांनी इंग्रजसरकारांस मध्यस्थी घालून कोल्हापुरच्या महाराजांकडून ही जहागीर परत मिळवून देण्याची खटपट केली. ह्या संबंधाने महाराजांची अट अशी होती कीं, हिंदुरावांनी आपल्या दरबारांत जहागीर मागण्यास स्वतः यावें. परंतु हिंदुराव ती गोष्ट मान्य करीनात. अखेर इंग्रजसरकारांनी कोल्हापुरावर सैन्य नेलें; तेव्हां कोल्हापुरच्या महाराजांनी, ता. ३० डिसेंबर इ. स. १८२५ रोजीं, इंग्रजांशी तह करून हिंदुरावांची जहागीर सोडून दिली; व त्यांना कोणत्याही प्रकारें उपद्रव करणार नाही असे मान्य केलें.