पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९

ह्यांचें अभिधान देण्यांत आलें, व त्यांच्या नांवानें जयघोष करण्यांत आला. ह्याप्रमाणें मध्यान्ह समय पावेतों समारंभ होऊन, रीतीप्रमाणे अत्तरगुलाब व पानसुपारी होऊन दरबार बरखास्त झाला.

 राज्याभिषेकसमारंभ आटोपल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेर दरबारचे सरदार व मुत्सद्दी लोक ह्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणें पोषाख व बहुमान देऊन संतुष्ट केलें. कै. महाराज दौलतराव शिंदे ह्यांचे कारकीर्दींत जे लोक आपल्या कर्तृत्वशक्तीनें आणि मर्दुमकीनें योग्यतेस चढले होते, त्यांस व त्यांच्या वंशजांस बायजाबाईसाहेबांनीं पूर्णपणें अभय देऊन, त्यांच्या पूर्वींच्या जहागिरी, तैनाती अथवा नेमणुका ह्यांत बिलकूल अंतर पडूं दिलें नाहीं. त्यामुळें त्यांची कारकीर्द लोकप्रिय होऊन सर्व लोक त्यांच्या आज्ञेमध्ये वर्तूं लागले; व दरबारची शिस्त उत्तम राहून ग्वाल्हेरच्या प्रजेस राजक्रांतीचे कोणतेही दुःख सहन करण्याचा प्रसंग आला नाहीं.

 बायजाबाईसाहेब ह्यांच्या दरबारीं कोण कोण सरदार व मुत्सद्दी होते ह्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. ती पाहिली ह्मणजे बायजाबाईंची जुन्या सेवकांविषयींची प्रीति व राजव्यवहारचातुर्य ह्या गुणांचें प्रकाशन झाल्यावांचून राहत नाही. जातीची अबला होऊन ज्या राजस्त्रीनें आपल्या दरबारांत राजकारस्थानपटु, तरवारबहादुर, व बुद्धिवैभवसंपन्न अशा मंत्रिमंडळाचा व सेनाग्रंणींचा संग्रह केला होता, त्या स्त्रीच्या शहाणपणाची व हुशारीची तारीफ कोण करणार नाहीं? असो. बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत जे सरदार व मुत्सद्दी होते त्यांची माहिती येणेप्रमाणेः-

 जयसिंगराव घाटगे हिंदुरावः—हे सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांचे चिरंजीव व बायजाबाईसाहेबांचे वडील बंधु होत. सर्जेराव घाटगे ह्यांचा दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारी इ. स. १८१० सालीं वध