पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८

 रविवार ता. १७ जून रोजीं ग्वाल्हेर येथील राजवाड्यांत मुकुटराव ह्यांचा दत्तविधनिविधि व लग्नसमारंभ फार थाटानें झाला. नंतर दुसरे दिवशीं-ह्मणजे सोमवार ता. १८ रोजीं, राज्याभिषेक समारंभ झाला. ह्या दिवशीं सर्व नगरामध्यें आनंदप्रदर्शनार्थ गुढ्या तोरणें उभारली होतीं; व जिकडे तिकडे मंगलोत्सव दृष्टीस पडत होता. त्या दिवशीं प्रातःकाळीं वधूवरांची वरात हत्तीवरून मोठ्या समारंभानें वाजत गाजत निघाली व गृहप्रवेश होऊन बायजाबाईसाहेबांनी उभय मुलांस मांडीवर घेऊन त्यांच्या तोंडांत साखर घातली. ह्याप्रमाणें लग्नसोहळा झाल्यानंतर राजवाड्यामध्यें राज्याभिषेकाचा थाट उडाला. ब्रिटिश रेसिडेंट मेजर स्टुअर्ट व त्यांचे असिस्टंट आणि इतर युरोपियन लष्करी कामगार आपापले दरबारी पोषाख करून व सुवर्णांकित म्यानाच्या समशेरी कमरेस लटकावून सभास्थानीं येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणें ग्वाल्हेर संस्थानचे सर्व सरदार, दरकार, मानकरी, मुत्सद्दी वगैरे लोक आपापल्या इतमामानिशीं दरबारांत हजर झाले. राजवाड्यापुढें घोडेस्वार, शिबंदी, प्यादे ह्यांची निरनिराळीं पलटणें खडी ताजीम देण्याकरितां खडीं होती. ह्याप्रमाणें दरबार भरून सुमुहूर्त वेळा प्राप्त होतांच, हिंदुरावांनीं मुकुटराव ह्यांस अंतःपुरांतून दरबारमहालामध्यें आणिलें. नंतर ब्रिटिश रेसिडेंट व सर्व दरबारी लोक ह्यांनीं खडी ताजीम देऊन महाराजांस सिंहासनावर आरूढ केलें. तों इकडे तोफा व बंदुका ह्यांचे मोठमोठे आवाज निघून त्यांनी नभोमंडल भरून गेलें. ह्याप्रमाणें मुकुटराव ग्वाल्हेरचे अधिपति झाल्यानंतर मेजर स्टुअर्ट ह्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांचा खलिता व उभय वधूवरांस सादर करण्याकरिता त्यांच्याकडून आलेली बहुमूल्य खिलात अर्पण केली. नंतर सरदार व बडे लोक ह्यांनी अनेक नजरनजराणे व मूल्यवान् वस्त्रें महाराजांस व बाईसाहेबांस नजर केली. ह्या वेळीं मुकुटराव ह्यांस शिंदे घराण्यांतील रणशूर वीर जनकोजी