पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७

मुलाचे उच्च प्रतीचे ग्रह वर्तविले. त्याचप्रमाणें सामुद्रिकांनीं त्याच्या शरीरावर राजचिन्हें आहेत असे सांगितलें. ह्याप्रमाणें राजपद उपभोगण्यास हा मुलगा पात्र आहे, असें सशास्त्र ठरल्यानंतर, शनिवार ता. १६ जून इ. स. १८२७ रोजीं, बायजाबाईसाहेबांनी आपले बंधु हिंदुराव आणि ग्वाल्हेरचे दिवाण बापूजी रघुनाथ, व इतर मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांस पाचारण करून त्यांचा दरबार भरविला, व त्यामध्यें हा मुलगा दत्तक घेऊन त्यास संस्थानाचा अधिपति करण्याबद्दल त्यांची संमति विचारली. सर्व मंडळींनीं मुलगा पसंत करून त्यास गादीवर बसविण्याबद्दल आपलें पूर्णपणे अनुमोदन दिलें. नंतर बाईसाहेबांनीं ता. १८ जून इ. स. १८२७ ह्या शुभदिनीं दत्तविधान व राज्याभिषेक समारंभ करण्याचा बेत ठरविला. बाईसाहेबांच्या मनांत ह्या मुलांस आपल्या मुलीची कन्या देऊन त्याचें लग्न करावें अशी इच्छा उत्पन्न झाली. तेव्हां त्यांनी शास्त्री व पंडित लोकांस बोलावून त्यांच्याकडून उभयतांचीं टिपणें पाहविलीं. त्यांत उभयतांची गणमैत्री जमल्यामुळें बाईसाहेबांनी आनंददायक राज्याभिषेकसमारंभाबरोबर मंगलकारक लग्नसमारंभही करण्याचे ठरविलें.


 १ सर्व सरदार व मुत्सद्दी लोकांचा दरबार भरवून सर्वांच्या विचाराने बायजाबाईनीं दत्तविधान व राज्याभिषेक असे दोन्ही समारंभ ठरविले, ही गोष्ट ता. ९ जुलईच्या "कलकत्ता गव्हरमेंट ग्याझेट" मध्येही प्रसिद्ध झालेली आहे. त्यांत स्पष्ट लिहिलें आहे:-

 "On the Saturday previous, the chiefs and the ministers were assembled at the durbar, when the intentions of the Baiza Bai to adopt and place Mookut Rao on the musnud were publicly announced, and the opinions of the assembly were asked. Not a dissentient voice was heard, and all expressed their warm concurrence in the measure.”

 ह्यावरून बायजाबाईसाहेब ह्या लोकमताचें महत्त्व जाणत होत्या असें ह्मणण्यास हरकत नाहीं.