पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१

फार शोकी असून, त्यांच्या जवळ गानकलासंपन्न गुणिजन फार असत. त्यांच्यापुढें गवयी व कलावंतिणी ह्यांची हजिरी लागली नाहीं असा एकही दिवस जात नसे. ते ह्या कलेंतील पूर्ण रसज्ञ असून, ध्रुपदांचे मोठे भोक्ते होते, अशी ख्याति असे. त्यांना उद्यानविहाराचाही फार नाद असे. ग्वाल्हेरच्या सभोंवतीं त्यांनी अनेक बागबगीचे केले असून नेहमीं तेथें वनभोजनें व वनक्रीडा चालत असत.
 दौलतराव शिंदे ह्यांस दोन बायका होत्या. परंतु त्या दोघींमध्यें त्यांची बायजाबाईंवर फार प्रीति असे. त्यामुळें बायजाबाईसाहेब नेहमीं त्यांच्या सन्निध असत. त्या स्वतः चतुर व कुशाग्रबुद्धि असल्यामुळें दौलतराव शिंदे ह्यांच्यावर त्यांचे फार वजन असे. दौलतराव शिंदे हे हरहमेषा राजकीय अथवा घरगुती गोष्टींमध्ये त्यांची सल्लामसलत घेत असत. बायजाबाई ह्यांचे दौलतरावांवर विशेष वजन होतें ह्याचें कारण एका इंग्रज गृहस्थाने असें दिले आहे कीं, "बायजाबाई ह्या राठोर रजपुतांच्या उच्च कुलांतील असल्यामुळें व दौलतराव हे कमी प्रतीच्या मराठ्यांच्या कुलांतील असल्यामुळें, केवळ कुलभेदामुळें त्यांना एवढें वर्चस्व प्राप्त झाले." परंतु हें कारण सयुक्तिक नाहीं. कां कीं, केवळ कुलाच्या उच्चतेमुळें बायजाबाईंचें दौलतरावांसारख्या पाणीदार व ऐश्वर्यसंपन्न पतीवर वर्चस्व बसलें नसून, त्यांच्या अंगचे विशिष्ट गुणच त्याला कारण झाले होते.
 दौलतराव शिंदे ह्यांचें स्वतःच्या दरबारांतील मुत्सद्यांशीं व परराज्यांतील वकिलांशीं जें वर्तन असे, तें फार प्रतिष्ठेचें व सभ्यपणाचें असे. मोठमोठ्या राजकारस्थानांच्या गोष्टींबद्दल देखील जो वादविवाद व जीं संभाषणें व्हावयाचीं, तीं ह्या दरबारच्या आदबीमुळें, दिवाणाच्या


 १ "Her descent was from the Rahtore Rajpoots, which alone gave her great power over him, as he was of lower caste.”