युरोपियन लोक, त्यांची इंग्लंडच्या आठव्या हेन्री राजाशीं तुलना करीत असत. त्यांचे पागोटें लहान व पिळदार असून, तें सध्यांच्या ग्वाल्हेर दरबारच्या चालीप्रमाणे कलतें घालण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांचा पोषाख फार साधा असे. एक तलम झिरझिरीत पांढरा आंगरखा व गुडघ्यापर्यंत लांब असा रेशमी तंग चोळणा हीं फक्त त्यांच्या पोषाखाचीं दोन वस्त्रे असत. त्यांच्या गळ्यामध्ये बकुळाएवढ्या पाणीदार मोत्यांचे व तेजस्वी पाचांचे फार मूल्यवान् कंठे असत. दौलतरावांस मोत्यांचा फार शोक असून, नेहमीं उत्तम मोत्यें पाहिली की, त्यांचा संग्रह केल्यावांचून ते राहत नसत. त्यांच्या मोत्यांच्या आवडीवरून त्यांस लष्करांतील लोक "मोतीवाले महाराज" असें विनोदानें ह्मणत असत.
हे शिकार करण्यामध्ये फार निष्णात असून, त्यांचा काल बहुतेक घोड्याच्या पाठीवर वाघांची शिकार करण्यांत जात असे. नेम मारण्यांत त्यांचा हातखंडा असे. नदीच्या कांठीं तासांचेतास बसून मासे धरण्याचाही त्यांना नाद असे. घोड्यावर बसण्यांत व भाला मारण्यांत हे पटाईत होते. हे दोन गुण त्यांच्या सहवासाने बायजाबाई ह्यांच्या अंगीं पूर्णत्वेंकरून वसत होते. ते जातीनें आळशी स्वभावाचे असून सदां ऐषआरामांत राहण्याची त्यांना संवय असे. अगदी बालवयामध्यें त्यांच्या हातून कांहीं क्रूरपणाच्या व कडक गोष्टी घडल्या; परंतु पुढें केव्हांही तशा गोष्टी करण्यास ते सहसा प्रवृत्त होत नसत. ते स्वधर्मनिष्ठ असून पाटीलबावांप्रमाणेच मोठे कृष्णभक्त होते. सकाळसंध्याकाळी देवपूजा वगैरे करण्याचा त्यांचा नित्य नियम असे.
दौलतराव शिंदे ह्यांच्या कालामध्यें ज्ञानप्रसार कमी असल्यामुळें ग्रंथवाचनाची अभिरुचि बेताचीच असे. त्यामुळें मनाचें रंजन करण्याचीं साधनें व मार्ग हीं वर्तमानकालाप्रमाणें नसून, गाणेंबजावणें व नाचरंग ह्यांवर त्या वेळीं फार बहार असे. दौलतराव शिंदे हे संगीताचे
पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/73
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०