Jump to content

पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२

आपणांस दोन बायका आहेत, त्याचा विचार काय ?” महाराजांनी उत्तर दिलें "होय. शिरस्त्याप्रमाणें माझ्या वडील पत्नीनें माझ्या पश्चात् राज्याचा कारभार चालवावा हें खरें आहे. परंतु राज्यभार हातीं घेणाऱ्या बायकोच्या अंगीं शहाणपण, जगाचें ज्ञान, व्यवहारांतला अनुभव हे गुण असावे लागतात. ह्या सर्वांची तिच्या ठिकाणीं वानवा आहे. त्यामुळें ती राज्य करण्याचे कामीं अगदीं अपात्र आहे. तिनें फक्त राजवाड्यांत बसावें आणि दुवक्तां जेवावें. ह्यापेक्षां तिच्या अंगीं अधिक कांहीं नाहीं." अशा प्रकारें दौलतराव शिंदे ह्यांनी रेसिडेंट साहेबांशीं संभाषण करून आपल्या दोन्ही राण्यांविषयीं आपलें मत कळविले. त्यावरून मेजर स्टुअर्ट ह्यांची बायजाबाईंच्या योग्यतेबद्दल खात्री झाली; व आपल्या पश्चात् बायजाबाईनीं राज्यकारभार चालवावा अशी महाराजांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले. मे. स्टुअर्ट ह्यांनी महाराजांजवळ आणखीही दोन चारवेळां ह्या प्रश्नाची वाटाघाट केली. परंतु ज्या ज्या वेळीं हा प्रश्न निघाला, त्या त्या वेळीं महाराजांनीं, बायजाबाई शहाण्या व चतुर आहेत असे दर्शवून, "ह्या प्रश्नाचा ब्रिटिशसरकाराने वाटेल तो निकाल करावा; त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे." असेंच सांगितले.
 दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति दिवसेंदिवस फार बिघडत चालली. पौष महिन्यांत महाराजांनीं मेजर स्टुअर्ट व आग्रा येथील आपले युरोपियन मित्र ह्यांस संक्रांतीचा शेवटचा तिळगूळ पाठविला. बायजाबाईनीं संक्रांतीप्रीत्यर्थ बहुत दानें व देकार केला. ता. १३ जानेवारी रोजी त्यांनीं हिंदुरावांस सांगून, काशीचे गंगापुत्र व मथुरेचे चोबे मिळून दोन हजार लोक बोलाविले. व प्रत्येकास एक शेर मिठाई, एक रुपया दक्षणा व लोटाभर तांदूळ देऊन सर्वांस संतुष्ट केलें.त्याचप्रमाणे ब्राह्मणभोजनें वगैरे घालून हिंदुचालीप्रमाणें सर्व दानधर्म, प्रायश्चित्तें व