पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भाग ४ था.

दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.

 हाराज दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति इ. स. १८२६ च्या आक्टोबर महिन्यापासून बिघडत चालली, व ग्वाल्हेरच्या उत्तम उत्तम राजवैद्यांचे औषधोपचार चालू झाले. महाराजांची प्रियपत्नी बायजाबाई ह्यांस महाराजांच्या प्रकृतीबद्दल फार काळजी उत्पन्न झाली. महाराजांविषयी त्यांचा फार प्रेमभाव असल्यामुळें त्या महाराजांच्या शुश्रूषेत अगदीं तत्पर असत. महाराज आजारी असल्याचे वर्तमान ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांस व त्यांचे असिस्टंट क्याप्टन फ्लेमिंग ह्यांस कळल्यामुळें ते उभयतां महाराजांच्या समाचाराकरितां वारंवार राजवाड्यांत येत असत. महाराजांचा व मेजर स्टुअर्ट ह्यांचा चांगल्या प्रकारचा स्नेहसंबंध असून ते परस्परांशी मोकळ्या मनाने वागत असत. त्यांनी महाराज दौलतराव शिंदे आजारी असल्याचे वर्तमान रीतीप्रमाणे गव्हरनर जनरल साहेबांस कळविलें. महाराज दौलतराव हे हिंदुस्थानांतील एका स्वतंत्र व बलाढ्य संस्थानाचे अधिपति असून, ते ब्रिटिश सरकाराशीं फार दोस्तीनें वागत असल्यामुळें, त्यांच्याबद्दल हिंदुस्थान सरकारही फार मर्यादेनें व प्रेमभावानें वागत असे. महाराज आजारी असून त्यांची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण होत चालली हें पाहून, मेजर स्टुअर्ट ह्यांनीं, महाराजांस दत्तक पुत्र घेऊन गादीच्या वारसाची योग्य व्यवस्था