पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३८

होऊन इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललें नाहीं. एकंदरीत त्यांनी ह्या वेळीं जें वर्तन केले, तेंच त्यांचें राज्य सुरक्षित राहण्यास कारण झालें. पेंढारी लोकांचे बंड मोडल्यापासून मध्य हिंदुस्थानांत बरीच शांतता झाली. तेणेंकरून शिंद्यांचे उत्पन्न २० लक्ष रुपये अधिक वाढलें व इतर रीतीनेंही पुष्कळ फायदे झाले. इ. स. १८१८ पासून दौलतराव शिंदे हे इंग्रजसरकाराशीं अत्यंत स्नेहभावाने वागून त्यांचे विश्वासू दोस्त बनले. त्यामुळे इंग्रजसरकारही त्यांचा उत्तम प्रकारचा मानमरातब ठेवीत असे. तात्पर्य, इ. स. १८१८ सालीं सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानामध्यें कंपनी सरकारची सार्वभौम सत्ता संस्थापित केल्यापासून इ. स. १८२७ सालापर्यंंत, ह्मणजे दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूपर्यंत, ग्वाल्हेर दरबारामध्ये ह्मणण्यासारख्या विशेष गोष्टी किंवा राजकीय चळवळी कांहीं घडून आल्या नाहींत.