युद्धामध्यें देखील मराठ्यांनी आपला असाच पराक्रम दाखविला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. तेव्हां अखेर, ता. ३० दिसेंबर इ. स. १८०३ रोजी, सुर्जीअंजनगांव येथे, दौलतराव शिंदे ह्यांचे वकील विठ्ठल महादेव, मुनशी कवलनयन, यशवंतराव घोरपडे आणि नारो हरी ह्यांनीं जनरल आर्थर वेलस्ली ह्यांच्याशी तह ठरविला. ह्या तहानें शिंद्यांच्या ताब्यांतील बराच प्रांत इंग्रजांकडे गेला; व त्यांचें पुष्कळ स्वातंत्र्य नष्ट झालें. इंग्रजांचा रेसिडंट शिंद्यांच्या दरबारीं प्रविष्ट झाला; व इंग्रजांची कांहीं फौज शिंद्यांच्या मदतीकरितां त्यांच्या सरहद्दीवर येऊन दाखल झाली.
सुर्जीअंजनगांवचा तह झाल्यानंतर पुनः इंग्रजांचा व शिंद्यांचा कांहीं दिवस बिघाड झाला. दौलतरावांनीं यशवंतराव होळकर व रघुजी भोंसले ह्यांस सामील होऊन पुनः इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फल होऊन अखेर त्यांस मेजर मालकम ह्यांच्या बरोबर ता. २२ नोव्हेंबर इ. स. १८०५ रोजी तह करणें प्राप्त झाले. ह्या तहामध्यें विशेषेंकरून पूर्वींच्या तहांतील अटी मान्य करून क्वचित् फेरफार केले होते. पूर्वींच्या तहांत ग्वाल्हेर व गोहद प्रांत दौलतराव शिंद्यांस न देता, त्याबद्दल १५ लक्ष रुपयांची नेमणूक देण्याचा ठराव होता; परंतु ह्या तहनाम्याने ते प्रांत शिंद्यांच्या आग्रहास्तव त्यांस परत दिले. ह्या प्रांताबद्दल इंग्रज मुत्सद्दयांचा पुष्कळ वादविवाद होऊन, अखेर इंग्रजांचा नावलौकिक रक्षण करण्याकरिता ते त्यांस परत द्यावे असें १[१]ठरले.
- ↑ ह्या वेळचे सर जॉन मालकम, जनरल वेलस्ली वगैरे मुत्सद्दी इंग्रजांच्या नांवाबद्दल कशी काळजी बाळगीत असत, हें ह्यावरून शिकण्यासारखें आहे. ग्वाल्हेर व गोहद प्रांत शिंद्यांस देण्याबद्दल ज्या वेळीं भवति न भवति झाली,