पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३

चालून गेले. त्यामुळें बाजीराव पेशवे हे भयभीत होऊन इंग्रजांकडे पळून गेले, व त्यांनी वसई मुक्कामीं ता. ३१ दिसेंबर इ. स. १८०२ रोजी इंग्रजांशी तह करून त्यांचे सख्य संपादन केलें. वसईचा तह हा इतिहासांत प्रसिद्ध आहे. हाच तह परकीय सत्तेचा मराठ्यांच्या दरबारांत पूर्ण प्रवेश होण्यास कारण झाला.

 वसईचा तह हा मराठ्यांचे स्वातंत्र्य नष्ट करणारा असल्यामुळें तो दौलतराव शिंदे, रघुजी भोंसले व यशवंतराव होळकर ह्यांस रुचला नाहीं. त्यामुळें ते त्या तहाप्रमाणें बाजीरावांस सामील होऊन इंग्रजांशीं सख्य करण्यास मान्य होईनात. तेव्हां त्यांची सत्ता कमी करावी ह्या उद्देशाने त्यांचे व इंग्रजांचे युद्ध सुरू झाले. ह्या युद्धामध्यें मराठ्यांचें सैन्य ५०००० घोडेस्वार व ३०००० पायदळ व गोलंदाज मिळून एकंदर एक लक्ष होते. इंग्रजांचे सैन्य एकंदर ५०००० असून त्यावर त्यांचे प्रसिद्ध सेनापति जनरल वेलस्ली व लॉर्ड लेक हे होते. त्यांच्या व मराठ्यांच्या चकमकी सुरू झाल्या. त्यांत लासवारी, दिल्ली, आसई, अल्लीगड, वगैरे ठिकाणी फार तुमुल युद्धें झाली; व उभयपक्षांचें अद्वितीय शौर्य व्यक्त झालें. ता. २ दिसेंबर इ. स. १८०३ रोजीं, लासवारी येथील लढाईचा वृत्तांत लिहितांना, लॉर्ड लेक ह्यांनीं शिंद्यांच्या पक्षाकडील सैन्याची व तोफखान्याची फार फार प्रशंसा केली आहे. त्यांत त्यांनी शेवटीं असेंही ह्मटलें आहे कीं, “प्रतिपक्षाचे सैनिक लोक केवळ राक्षसाप्रमाणें ह्मणा, किंवा योध्याप्रमाणे ह्मणा, पण फार निकरानें लढले; व त्यांच्याशी आह्मीं अतिशय प्रबल व अजिंक्य शत्रू समजून लढाई केली; ह्मणूनच आह्मांस यश आलें. तशा रीतीनें आह्मी लढलों नसतो, तर खचित आमचा पराजय झाला असता!" ह्याप्रमाणें मराठी सैन्यानें आपलें शौर्य गाजविलें. परंतु प्रतिपक्षाच्या गनिमी काव्यानें त्यांस यश येऊं दिले नाहीं. जनरल वेलस्ली ह्यांच्या आसई येथील