करून, ज्यांनी आपल्या अलौकिक शौर्याची, अचाट साहसाची, अतर्क्य देशभक्तीची, आणि अपूर्व स्वार्थत्यागाची सीमा करून दाखविली; आणि यवनांचा पराभव करून महाराष्ट्रराज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचे रक्षण केलें; त्या वंदनीय वीरश्रेष्ठांपैकीं ह्या घराण्यांतील मूळ पुरुष एक होत एवढें सांगितलें, ह्मणजे ह्या घराण्याच्या थोरपणाबद्दल किंवा कुलीनतेबद्दल अधिक प्रशंसा करण्याचें प्रयोजन नाहीं. हणमंतराव पाटणकर हे नांव महाराष्ट्राच्या इतिहासांत प्रसिद्ध आहे. ह्यांनी राजाराम महाराजांच्या चंदीच्या राजकारणांत उत्कृष्ट स्वामिसेवा केल्यामुळे त्यांस 'समशेरबहादुर' हा किताब व पाटणखोऱ्यातींल ४० गांवांची पाटण कसब्यासुद्धां जहागीर इनाम मिळाली होती. त्यांच्या पूर्वजांचे पूर्वींचें उपनांव साळुंखे हे असून, हे पूर्वापार पाटणचे देशमुख होते. पुढे हे पाटणास राहूं लागल्यापासून ह्यांस पाटणकर हे नांव प्राप्त झाले. ह्यांचे राहण्याचे ठिकाण पाटण हें असून, तें साता-याचे नैर्ऋत्येस १५ कोसांवर कोयना नदीचे कांठीं आहे. येथे त्यांचा पूर्वींचा जुना वाडा वगैरे असून तेथील इनामदार ह्या नात्यानें त्यांच्या वंशजांची योग्यता अद्यापि फार आहे; व दक्षिणेंतील सरदारांच्या पटामध्यें ते उच्च प्रतीचे सरदार आहेत.
हणमंतराव पाटणकर ह्यांस दारकोजीराव, हिरोजीराव, आणि धारराव असे तीन पुत्र होते. ते आपल्या वडिलांप्रमाणेच कर्तृत्ववान् व पराक्रमशाली होते. ह्यांपैकी पहिले दारकोजीराव ह्यांस सात पुत्र होते. त्यांपैकीं रामराव व लक्ष्मणराव ह्यांचा वंश नष्ट झाला; व बाकीचे आपापल्या योग्यतेप्रमाणें नावारूपास आले. ह्या पांच जणांची नांवे येणेंप्रमाणें:–बाबूराव, बाळोजीराव, राघोजीराव, बाजीराव व जयरामराव. ह्यांपैकीं चौथे-बाजीराव हे बायजाबाई साहेबांचे मातामह होत. हे मोठे रणशूर पुरुष होते. पेशव्यांनी अखेरच्या अमदानींत जुन्या मराठे घराण्यांतील शूर पुरुषांचा परामर्ष न घेतल्यामुळें अनेक तेजस्वी व बाणेदार
पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/45
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२