पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१


 सवाई माधवराव ह्यांच्या मृत्यूनंतर, पेशव्यांच्या गादीवर कोणास बसवावें ह्याबद्दल वादविवाद चालू असतां, दौलतराव शिंदे ह्यांचे दिवाण बाळोबातात्या व परशुराम भाऊ पटवर्धन ह्या दोघांचे व नाना फडनविसांचे वैमनस्य येऊन, नानांस पुण्यांतून पळून जाण्याचा प्रसंग आला. त्या वेळीं सखारामराव घाटगे हे आपल्या पथकानिशीं दौलतराव शिंदे ह्यांच्या नौकरीस जाऊन राहिले. तेथें रायाजी पाटलांचा व त्यांचा चांगला स्नेहसंबंध जडल्यामुळें त्यांची दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारांत चांगली चाहा झाली. अशा रीतीनें शिंद्यांच्या दरबारात प्रवेश होतांच, सखारामराव ह्यांनीं, आपल्या गोड व मोहक वाणीनें, आपल्या उत्सवप्रिय व तरुण यजमानांचे मन तेव्हांच वेधून टाकिलें. अर्थात्, दौलतराव शिंदे ह्यांची सखारामराव घाटग्यांवर पूर्ण मेहेरबानी जडल्यामुळें, त्यांस पुणेंदरबारांत आपलें वर्चस्व स्थापन करण्यास विलंब लागला नाहीं. सखारामराव हे इतिहासांत 'सर्जेराव घाटगे' ह्या नावाने प्रसिद्ध आहेत. हे सर्जेराव घाटगे आमच्या चरित्रनायिका बायजाबाई ह्यांचे जनक होत. 
 बायजाबाईंच्या मातुल घराण्याची थोडीशी हकीकत येथें सादर केली पाहिजे. बायजाबाईंचे वडील ज्याप्रमाणे पुरातन, घरंदाज, पराक्रमी व अस्सल मराठे घराण्यांतील होते; त्याप्रमाणें त्यांच्या मातुश्री ह्याही जुन्या व इतिहासप्रसिद्ध घराण्यांतील होत्या. हे घराणें अस्सल मराठ्यांपैकी असून, ह्यांतील पुरुषांनी महाराष्ट्रराज्यरक्षणाचे कामीं पराकाष्ठेचें साहाय्य करून, आपली स्वामिनिष्ठा व स्वदेशभक्ति व्यक्त केली आहे. औरंगजेब बादशाहानें दक्षिणेंत येऊन सर्व महाराष्ट्रप्रांत काबीज केला; व छत्रपति शिवाजी महाराजांनी संस्थापित केलेलें मराठी राज्य व महाराष्ट्रधर्म ह्यांचा समूळ विध्वंस होण्याचा बिकट प्रसंग प्राप्त झाला; त्या वेळीं, कर्नाटकप्रांतीं, राजाराम महाराजांस अप्रतिम साहाय्य