पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२




व नालकी व झालदार पालखी व शिक्केकटार व माहीमरातीब व तमनतोग हत्ती व घोडा आदिकरून पादशाहाकडून आलें होतें, तें बहुत आदरेंकरून घेतलें. श्रीमंतांनीं नजर एकशेंएक मोहरा पादशाहास ठेविली. पाटीलबावांनी एकावन्न मोहरा डेऱ्यांतच श्रीमंतांस नजर करून आदब बजाविली. तेथें तोफा वगैरेंच्या सलाम्या होऊन, श्रीमंत वाड्यांत आल्यावर सर्वत्रांनीं नजरा करून आदब बजाविली. समारंभ चांगला जाहला. ह्मणोन विस्तारें लिहिलें. ह्याजवरून बहुत संतोष जाहला. श्रीमंतांचा प्रताप थोर. ताळे शिकंदर. पाटीलबावा यांणीं गुलामकादर याचें पारिपत्य करून पादशाहाची मर्जी खुश केली. त्यांणीं श्रीमंतास बहुमान पाठविला. समारंभ बहुत चांगला जाहला. ह्या मोठ्याच गोष्टी आहेत. मुख्य गोष्ट श्रीमंतांचा प्रभाव. त्या योगेंकरून पाटीलबावांनी त्या प्रांतीं नक्ष केला. त्याप्रमाणेंच हुजूरही पादशाहाची मर्यादा रक्षून बहुमान घेतले. त्याचप्रमाणें समारंभ जाले. व श्रीमंत वाडियांत आल्यावर दोहों पदांचीं पादशाहाकडील मुतालकीचीं वस्त्रें श्रीमंतांनी पाटीलबावांस खासगीचा पोशाख व जेगा, सरपेच कंठी व ढालतरवार, व नालकी व हत्ती घोडा याप्रमाणे दिल्हें. त्याची नजर पाटीलबावांनी श्रीमंतांस पन्नास मोहरा करून आदब बजाविली. हे पाटीलवावांची सरफराजी चांगली जाहली. उत्तम आहे. हीं पदें भलत्यास प्राप्त व्हावयाचीं नाहींत. रा. पाटीलबावा यांणीं त्या देशांत बहुत कष्ट मेहेनत करून शत्रू पादाक्रांत केले. पादशाहीचा बंदोबस्त करून पादशाहांस बहुत खुश केलें. त्याचे येथें कोणी सरदार राहिला नाहीं. बाहेरील सरदार येऊन बंदोबस्त केला. तेव्हां सहजच देणे प्राप्त जाहलें. आपण दुरंदेशी चित्तांत आणून, महाराजांची आज्ञा आणवून, बहुत (बहुमान ?) घेतले ही मोठी थोर गोष्ट केली. आजपावेतों कोठेही व्यंग पडलें नाहीं. पुढें दिवसेंदिवस श्रीमंतही थोर जाहले; आणि आपली निष्ठा श्रीमंतांचे ठायीं. तेथे विस्तार काय ल्याहावा ? तसेच पाटीलवावांनी तिकडे मेहेनत करून पदें वगैरे मिळविली, ती सर्व एकनिष्ठपणे श्रीमंतांस प्रविष्ट केली; हे त्यांचे निष्ठेस योग्य. दुस-याकडून व्हावयाचें नाहीं. पाटिलांप्रमाणे निष्ठा कोणाचीही पाहिली नाहीं. कोठवर वर्णना ल्याहावी ? श्रीमंतांचा प्रताप थोर. मोठी कामें सहजांत घडतात. बहुत काय लिहिणे, कृपा करावी हे विनंति."