अठराव्या शतकाच्या प्रारंभीं, मराठी राज्याच्या अभ्युदयार्थ जे पराक्रमपटु व शौर्यशाली वीरपुरुष अवतीर्ण झाले, त्यांमध्ये राणोजी शिंदे व मल्हारजी होळकर हे दोघे प्रमुख होत. इ. स. १७२५ सालापासून ह्या उभय वीरांच्या मर्दुमकीस प्रारंभ झाला, व छत्रपति शाहू महाराज व पेशवे ह्यांच्याकडून त्यांच्या रणशौर्याचे अभिनंदन होऊन, त्यांस जहागिरी व सरंजाम बक्षीस मिळूं लागले. राणोजी शिंदे ह्यास छ ५ मोहरम सीत अशरीन ह्या तारखेस सरदारी व पालखीचा सरंजाम मिळाला, व तेव्हांपासून त्याचा उत्कर्ष होत चालला. ह्यानें बाजीराव पेशवे ह्यांच्या निरनिराळ्या मोहिमांमध्यें पराक्रमाचीं अलौकिक कामें करून मराठी राज्यास उत्कृष्ट मदत केली; व दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकवून, पुष्कळ प्रांत व चौथ सरदेशमुखींचे हक्क मराठ्यांस प्राप्त करून दिले. दिल्लीकडील इ. स. १७३६ सालच्या स्वारीमध्यें राणोजीनें ८००० मुसलमान स्वारांशीं टक्कर देऊन व त्यांची वाताहत करून जो विजय मिळविला, तो फार प्रशंसनीय होता. ह्याने निजामावरील मोहिमांमध्यें व वसईच्या स्वारीच्या वेळीं आपलें शौर्यतेज चांगलें प्रकाशित केलें. हा रणशूर सरदार इ. स. १७४७ चे सुमारास सुजालपूर येथें मृत्यु पावला. मरणसमयीं ह्याजकडे एकंदर ६५ लक्षांचा प्रांत होता. जो पुरुष प्रारंभीं एक लहानसा हुजऱ्या होता, तो पुढे स्वतःच्या कर्तृत्वानें व मर्दुमकीनें इतका ऐश्वर्यसंपन्न बनला; हें लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे स्वतःच्या कर्तृत्वानें मनुष्यास आपला कसा अभ्युदय करून घेतां येतो, हें चांगले शिकण्यासारखें आहे. असो. राणोजीची छत्री उत्तर हिंदुस्थानांत सुजालपूर ह्या गांवीं असून तेथें राणेगंज ह्या नांवाची पेठ वसली आहे. सुजालपूर हा गांव पेशव्यांकडून छ १ रजब समान आर्बैन १[१]ह्या तारखेस राणोजीच्या छत्री
- ↑ १ ता० २९ जून इ. स. १७४७ रोज सोमवार.