पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाहू महाराजांचे कारकीर्दींतील अव्वल राजकारणप्रसंगांत वेळोवेळी दृष्टीस पडते. त्यावरून हा महाराष्ट्रवीर समरभूमीवर बरीच वर्षे चमकत असावा असे वाटतें. थोरले राजाराम महाराज ह्यांचे कारकीर्दींत जे लोकोत्तर स्वदेशभक्त निर्माण झाले, व ज्यांनी जीवादारभ्य श्रमसाहस करून स्वराज्य रक्षण केलें, त्या परम वंदनीय वीरमंडलामध्ये नरसोजी व जिवाजी पाटील शिंदे तोरगलकर पागनीस ह्या दोघांची नावें अंतर्भूत आहेत. ह्यावरून शिंदे घराणे हे पूर्वीपासून विख्यात आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं.

 शिंदे घराण्याच्या थोरपणाबद्दल आणखी एक दाखला सांपडतो. औरंगजेब बादशाहाने, आपल्या पदरचे सरदार कण्हेरखेडेकर शिंदे ह्यांच्या कन्येशीं शाहू महाराजांचे लग्न इ. स. १७०६ साली लावून दिलें, ही गोष्ट इतिहासांत प्रसिद्धच आहे. ह्या मुलीचे नांव सावित्रीबाई असे होते. ही इ. स. १७१० मध्ये वारली. अर्थात् छत्रपति शाहू महाराज ह्यांच्या क्षत्रियकुलावतंस व सर्वश्रेष्ठ महाराष्ट्रकुलाशीं ज्या घराण्याचा शरीरसंबंध जडला होता, तें घराणे हीन ज्ञातीचें असेल हें संभवनीय दिसत नाहीं. क्याप्टन क्ल्यून्स ह्यांचेही असेच मत आहे.

  प्रकृत चरित्रनायिका श्रीमती महाराणी बायजाबाईसाहेब ज्या शिंदे घराण्यांत प्रसिद्ध झाल्या, त्या घराण्याचा मूळ पुरुष राणोजी शिंदे हा होय. ह्याची माहिती देतांना, मध्य हिंदुस्थानचे इतिहासकार सर जॉन मालकम ह्यांनी असें लिहिलें आहे कीं, शिंदे ह्यांचे घराणें मूळचें शूद्र जातीचें असून त्यांचा मूळ पुरुष राणोजी हा होय. हा मूळचा कण्हेरखेडचा पाटील होता. तो प्रथमतः बाळाजी विश्वनाथ पेशवे ह्यांच्या पदरीं नौकरीस राहिला. त्या वेळी त्याजकडे खिजमतगाराचें ह्मणजे हुजऱ्याचे काम होतें. पुढें तो बाजीराव बल्लाळ पेशवे ह्यांचे कार-