पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

आहे हे चांगलें सिद्ध होते. तात्पर्य, महाराष्ट्र स्त्रियांच्या चरित्रांवरून अनेक प्रकारचा बोध होण्यासारखा आहे, ह्यांत शंका नाहीं.

 बायजाबाईंच्या चरित्रामध्यें माहितीच्या कमतरतेमुळें अनेक दोष घडण्याचा संभव आहे. ह्याकरितां त्याबद्दल प्रांजलपणे माफी मागून, आणखी माहिती कोणाजवळ असल्यास ती त्यांनी आमच्याकडे अवश्य पाठवावी, अशी प्रार्थना आहे. तिचा द्वितीय आवृत्तीच्या वेळीं उपयोग करण्यांत येईल.

 शेवटीं, आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणें येथें अवश्य आहे. पूर्वी प्रसिद्ध केलेलें झांशीच्या राणीचे चरित्र सर्वांच्या आदरास पात्र झाले आहे, हे वर निर्दिष्ट केलेच आहे. तथापि त्या चरित्राच्या लेखनशैलीसंबंधाने एका विद्वान् टीकाकारांनी असा आक्षेप घेतला आहे कीं, तें कल्पनेच्या साहाय्यानें फुगवून लिहिलें आहे. परंतु हा आक्षेप अगदीं वृथा आहे. ह्या टीकेचा अर्थ, केवळे मनःकल्पित गोष्टीची भर घालून ग्रंथविस्तार केला, असा असेल तर तें म्हणणे यथार्थ नाही. कारण, त्या ग्रंथांत प्रमाणावांचून कोणतीही गोष्ट लिहिलेली नाहीं. परंतु इतिहास किंवा चरित्रवर्णनांत कल्पनाशक्तीची मुळीच मदत न घेतां, नुसती शुष्क हकीकत दाखल करावी, आणि त्यांत, शब्दसौष्ठव, भाषालंकार अथवा वर्णनचमत्कार वगैरे कांहीं नसावे, असा उद्देश असेल, तर तो आम्हांस मान्य नाहीं.

 इतिहास ह्मणजे मेकालेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे काव्य आणि तत्वज्ञान ह्यांचे मिश्रण होय. अर्थात् ह्या मिश्रणाचे साहाय्य घेतल्यावांचून कोणतेही ऐतिहासिक चरित्र हृदयंगम आणि सुरस वठणार नाहीं. ह्याप्रमाणे पाहिले असतां, चरित्रग्रंथामध्ये वर्णनात्मक व कल्पनाप्रचुर लेखनशैली कां ठेवूं नये हें समजत नाहीं. अस्सल माहितीच्या आधारें, सत्यास न सोडितां, वाटेल त्या तऱ्हेनें चरित्रग्रंथास रमणीयत्व प्राप्त होईल अशी भाषाशैली ठेवणें हे प्रत्येक ग्रंथकाराचे अवश्य कर्तव्य आहे. चरित्र व काव्य ह्यामध्ये किती निकट संबंध आहे, तें आंग्ल भाषेतील प्रख्यात ग्रंथकार कार्लाइल ह्याने एके ठिकाणी सांगितलेच आहे. तो म्हणतो:-