पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/152

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८

साहजिक आहे. तात्पर्य, अशा रीतीनें बायजाबाईसाहेबांनीं आपली मुत्सद्दीगिरी चालवून ग्वाल्हेरच्या खजिन्यावर आलेले संकट दूर केलें.

चातुर्य.

 बायजाबाईसाहेबांच्या चातुर्याच्या व शहाणपणाच्या गोष्टी अनेक प्रसिद्ध आहेत. त्यांपैकीं मौजेची एक गोष्ट येथें दाखल करितों. बायजाबाईसाहेबांच्या हातीं ग्वाल्हेरचा सर्व राज्यकारभार असतांना एके वेळीं त्यांनी तुळसीच्या लग्नाचा टोलेजंग समारंभ केला; आणि शिंदे घराण्यांतील पुरुषांच्या लग्नास जसा खर्च येतो, तसा प्रचंड खर्च केला. तुळसीच्या लग्नास असा मनस्वी खर्च झालेला पाहून, त्यांचे दिवाण बापूजी रघुनाथ ह्यांनी त्यांच्याजवळ नापसंती दर्शविली. बाईसाहेबांनी त्यांस कांहींएक उत्तर न देता, ती गोष्ट लक्ष्यांत ठेवून, लग्नसमारंभ उत्तम प्रकारें साजरा केला. नंतर एके दिवशी त्यांनीं शिंद्यांच्या घराण्यांतील चालीप्रमाणे लग्नाप्रीत्यर्थ नजरनजराणे व अहेर स्वीकारण्याचा दरबार भरविला; व त्यास सर्व सरदार, शिलेदार, मुत्सद्दी, वगैरेंनीं हजर राहून रीतीप्रमाणें लग्नाचे अहेर करावेत, असा हुकूम सोडिला. त्या दिवशीं बाईसाहेब स्वतः दरबारांत आल्या, व त्यांनी आपल्या गादीजवळ राधाकृष्णांच्या मूर्ती मांडून त्यांच्यापुढे सर्व नजरनजराणा व आहेर ठेवविला. अशा मंगल प्रसंगी नजरनजराणे व अहेर करणें सर्व लोकांस अगदी योग्य वाटून त्यांनी मोठ्या संतोषानें ते केले. येणेंप्रमाणें दरबार झाल्यानंतर बाईसाहेबांनी दिवाणास बोलावून आणून एकंदर नजरनजराण्यांची वगैरे जमा काय झाली तें विचारलें. दिवाणांनी खर्चापेक्षां जमेची रक्कम अधिक झाल्याचें सांगितले; आणि बाईसाहेबांच्या शहाणपणाची तारीफ करून आपला शब्द परत घेतला.

जुन्या चालीरीतींविषयी अभिमान.

 बायजाबाईसाहेबांस आपल्या हिंदु चालीरीतींचा व शिंद्यांच्या दरबारां-