पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२७



धूर्त, मायावी, मनसबेबाज, दक्ष अशी होतीच- परंतु तिच्यामध्ये आणखी विशेष गुण असा होता कीं, तिला मोह पाडून फसविण्यासारखें तिच्यामध्ये एकही व्यंग नव्हते. ह्या वस्ताद स्त्रीला आपल्याकडून सरकार उसने पैसे घेणार ही गुप्त बातमी कळली; आणि स्वाभाविकपणें, आपल्या खजिन्यावर संकट येणार ह्मणून तिला भीतिही उत्पन्न झाली. तेव्हां तिनें एक नामी युक्ति योजिली. तिनें आपले खाजगी कारभारी दादा खाजगीवाले ह्यांस बोलाविलें; आणि रेसिडेंटसाहेब आपल्याकडे पैसे मागण्याकरितां येण्यापूर्वींच, त्यांस रेसिडेंटसाहेबांकडे पाठविलें; आणि त्यांच्याकडून त्यांस असें विचारविलें कीं, "आमचें सैन्य पगार न मिळाल्यामुळें अगदीं बेदिल होऊन दंगा करण्याच्या बेतांत आहे, ह्याकरितां ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये आपण मेहेरबानी करून कर्ज देववाल काय ?" हा प्रश्न ऐकून रेसिडेंटसाहेब मनांतल्यामनांत थिजून गेले. अर्थात् ग्वाल्हेरच्या खजिन्यांत जर पैसे नाहींत व तेथील सैन्याच्या पगाराची अशी रड आहे, तर इंग्रज सरकारास कोठून पैसे मिळणार ? अशाप्रकारें दोन्ही गोष्टींचा हा चमत्कारिक मेळ बसलेला पाहून, रेसिडेंट कर्नल स्टुअर्ट हे निरुत्तर झाले; व त्यांनी मोठ्या दिलगिरीनें व विस्मयाने हिंदुस्थान सरकारास असें कळविलें, “महाराणी बायजाबाईसाहेब ह्यांनाच पैशाची फार जरूर आहे. त्यांचा खाजगी कारभारी मजकडे येऊन त्यानेंच मला असा प्रश्न विचारिला आहे की, ब्रिटिश सरकाराकडून आह्मांस दहा लक्ष रुपये उसने मिळतील काय ?"

 हे पत्र गेल्यानंतर काय घडलें असेल हे कल्पनेनें कोणासही सहज ताडितां येईल. ज्या अर्थी बायजाबाई ह्याच द्रव्याच्या अडचणींत असून, ग्वाल्हेर येथील फौजेचा पगार तुंबला आहे व ती फौज बिथरली आहे, त्या अर्थीं तेथून पैशाची अपेक्षा करणे योग्य नाहीं, असें समजून गव्हरनरजनरलसाहेबांस तो विचार सोडून देणे भाग पडलें असेल हें