पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११७



पोषाख व राहणी.

 बायजाबाईसाहेब ह्यांचा पोषाख व राहण्याची तऱ्हा फार साधी असे. दौलतराव शिंदे वारल्यानंतर त्यांनी केव्हांही अलंकार धारण केले नाहींत. त्या मोठ्या पतिनिष्ठ होत्या व त्यांच्यावर त्यांच्या पतीचें प्रेमही पराकाष्ठेचें होते. ब्रौटन नामक एका लष्करी अधिकाऱ्यानें आपल्या पुस्तकांत असें लिहिलें आहे कीं, "सर्जेरावांचा भयंकर रीतीनें खून झाल्याचें वृत्त बायजाबाईंस ज्या वेळीं समजलें, त्या वेळीं त्या दुःखसागरात बुडून गेल्या. त्या प्रसंगी खुद्द दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांचें सांत्वन केलें व त्यांचे अश्रु स्वतः आपल्या हातांनीं पुशिले." ह्यावरून त्यांच्या पतिप्रेमाची कल्पना करितां येईल. अर्थात् अशा प्रियकर पतीचा वियोग झाल्यामुळें बायजाबाईसाहेबांस आजन्म दुःख व्हावें हें साहजिक आहे. त्यांनी हिंदुस्थानांतील साध्वी व सुशील स्त्रियांप्रमाणें आपल्या पतीच्या पश्चात् आपले सौभाग्यालंकार व सर्व राजविलास सोडून दिले होते, आणि राज्याधिकाराची परिसमाप्ति झाल्यानंतर त्यांनीं आपलें सर्व लक्ष्य पारमार्थिक कृत्यांत घातलें होतें. त्या फक्त साधीं वस्त्रें परिधान करीत असत; आणि जमिनीवर निजत असत. मिसेस फेनी पार्क्स ह्या बाईनें ह्या गोष्टीचादेखील उल्लेख आपल्या प्रवासवृत्तामध्यें केला आहे. "बायजाबाई ह्या अगदीं साधें रेशमी वस्त्र नेसल्या होत्या. त्यांच्या हातांत सोन्याच्या साध्या पाटल्या मात्र होत्या. त्याशिवाय त्यांच्या अंगावर एकही अलंकार नव्हता. वैधव्यदशा प्राप्त झाल्यापासून त्यांनी रत्नालंकारांस स्पर्श केला नाही. त्यांनी अनेक नेमधर्म व उपासतापास स्वीकारिले होते. त्या सदोदित जमिनीवर निजत असत. त्यामुळे त्यांस संधिवाताची विकृति झाली. तेव्हांपासून त्यांच्या अंगाखालीं जाड्याभरड्या कापडाची गादी असे. परंतु त्या कधींही पलंगावर निजल्या नाहींत."